हैदराबाद : तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने कर्नाटक सरकारच्या दैनंदिन जाहिरातींवर तेलंगणात बंदी घातली आहे. भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचा हा निर्णय घेतला आहे. निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी काँग्रेस सार्वजनिक निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप भाजपने आपल्या तक्रारीत केला होता. निवडणूक आयोगाने कर्नाटक सरकारच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावली असून उद्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे. माहिती अधिकाऱ्यावर कारवाई का करू नये, असा सवालही आयोगाने केला.
तेलंगणात भाजपने अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत युती केली आहे. बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत होत असून त्यात आपले स्थान निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला असून दक्षिणेकडील एकमेव राज्यातून भाजपला सत्तेपासून दूर केले. तेलंगणात गुरुवारी निवडणुका होणार असून ३ डिसेंबर रोजी इतर चार राज्यांतील मतांसह मतमोजणी होणार आहे.