29.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रआता गोळ्या घातल्या तरी माघार नाही...

आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही…

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती. दरम्यान, यावेळी बोलताना मनोज जरांगे भावूक झाले आणि भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले. मनोज जरांगे भावूक झाल्याचे पाहून उपस्थित आंदोलकांचे देखील कंठ दाटून आले. तर, आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही असे मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे काही वेळात मुंबईकडे निघणार आहेत. यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

यावेळी बोलताना जरांगे भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. स्वत:ला सावरत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, आमरण उपोषण आणि मुंबईकडे जाण्याची घोषणा करून एक महिना झाला तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. एवढा निर्दयपणा यांच्या अंगात असणे म्हणजेच अन्यायाचा कळस झाला. त्यामुळे शेवटी आता मराठ्यांनाच शांततेचे अस्त्र हातात घेऊन, यांचे कायमचे भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही. कारण आपल्याच मुलांच्या नरड्यावर पाय द्यायचे यांनी ठरवले असेल, आपली मुले मोठी झाली नाही पाहिजेत असे यांनी ठरवले असेल, त्यामुळे यांचे राजकीय आयुष्य कायमचे सुपडासाफ केल्याशिवाय चालणार नाही, असे जरांगे म्हणाले. यावेळी बोलताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडले.

मुंबईकडे निघण्यासाठी आंदोलक तयार…
अंतरवाली सराटीमध्ये मुंबईत आंदोलनासाठी लगबग पाहायला मिळत असून, आंदोलकांमध्ये मोठा उत्साह आहे. पुढच्या काही वेळात मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेला रवाना होतील. मात्र, यापूर्वी गावात आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मराठवाड्यासह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक रात्रीपासूनच अंतरवालीत दाखल होताना पाहायला मिळत आहेत.

सराटीपासूनच पोलिस बंदोबस्त
मुंबई आंदोलनाची दिशा यापूर्वीच जरांगे यांनी जाहीर केली आहे. मुंबईला जाताना कसा मार्ग असणार, कुठे मुक्काम असणार याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अंतरवाली सराटीपासूनच पोलिस बंदोबस्त असणार आहे. तसेच, आंदोलनात सीआयडी, एसआयडी, आयबीचे अधिकारी देखील सहभागी असणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR