मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट हा किती अनिश्चिततेचा खेळ आहे ते पुन्हा एकदा दिसून आले. जायंट किलर अफगाणिस्तानने आणखी एका विश्वविजेत्याची शिकार जवळपास केलीच होती परंतु मॅक्सवेल नामक बाजीप्रभूने एकट्याने खिंड लढवली आणि विजयाचा गड सर केला. अफगाणच्या तोंडातला घास त्याने हिरावून घेतला. २९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १९ व्या षटकात कांगारूंची ७ बाद ९१ अशी दारुण स्थिती होती परंतु मॅक्सवेल नावाचे वादळ अफगाणिस्तानला तडीपार करून टाकेल असे कोणालाच वाटले नाही. मॅक्सला तीन वेळा जीवदान मिळाले हे खरे आहे परंतु जायबंदी झाला असतानाही तो अशी अविश्वसनीय खेळी करेल असे वाटले नाही. पायात पेटके आल्याने मॅक्सला धावता येत नव्हते.
पायाची हालचाल करता येत नव्हती तरी त्याने क्षेत्ररक्षणातल्या मोकळ्या जागा कशा काय हेरल्या, कडक चौकार कसे काय मारले आणि गेंड्याच्या ताकदीने गगनचुंबी षटकार कसे काय चढवले हे सारे आश्चर्यकारकच होते. तैमूरलंगी अवस्थेत त्याने अद्वितीय खेळी कशी काय केली त्याचे वर्णन करायला शब्दांचे दुर्भिक्ष आहे. १९६० च्या दशकात भारताचा माजी कर्णधार पतौडीने तैमूरलंगी अवस्थेत ऑस्ट्रेलियातील कसोटीत एक शतक आणि अर्धशतक ठोकले होते. परंतु वन डे क्रिकेटमध्ये असा पराक्रम आजवर कुणीही केला नव्हता. मॅक्सने कर्णधार कमिन्स समवेत आठव्या विकेटसाठी २०२ धावांची नाबाद भागीदारी केली, त्यात कमिन्सचा वाटा फक्त १२ धावांचा होता. पायात गोळे आल्याने घायाळ झालेला मॅक्स एकेरी धाव घेताना धडपडत होता.
चार्ली चॅप्लिनच्या चालीने चालत-पळत होता, धावबाद होऊ नये म्हणून लोटांगण घालत होता आणि उपचार घेऊन ‘पुन:श्च हरि ओम’ म्हणत होता. १२८ चेंडूंच्या खेळीत त्याने २१ चौकार आणि १० षटकार खेचले. त्याचा एक रिव्हर्स फ्लिकचा षटकार अफलातूनच होता. उभ्या उभ्या त्याने लगावलेले स्ट्रेट ड्राईव्हज, मिड ऑन- मिडविकेटला ठोकलेले चौकार अफलातूनच होते. षटकारामागची त्याची ताकद दृष्ट काढण्याजोगी होती. वन डे क्रिकेटमध्ये अशी खेळी पुन्हा होणे नाही.
अफगाणिस्तानने दिलेली लढत कौतुकास्पदच होती. त्यांना अनुभव कमी पडला. या सामन्यातून अथवा स्पर्धेतून त्यांना बरेच काही शिकता आले असेल. इब्राहिम झद्रानने निराश व्हायचे कारण नाही. त्याने सुरेख शतक ठोकले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने त्यांनी निराश होणे साहजिक आहे मात्र त्यांनी नाउमेद होऊ नये. शेवटी कर्णधार शाहिदी म्हणाला ते खरे आहे- क्रिकेट इज हे फनी गेम! ‘मॅक्सवेल नोज हाऊ टू प्ले ऑन इंडियन पिचेस’ कारण तो भारताचा जावई आहे.