30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रतपास यंत्रणांचा वापर करून खंडणी उकळण्याचे रॅकेट

तपास यंत्रणांचा वापर करून खंडणी उकळण्याचे रॅकेट

भिवंडी : ईडी, सीबीआय यांसारख्या महत्वाच्या तपास यंत्रणांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून दबाव टाकून भाजपचे विविध कंपन्यांकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड ( निवडणूक रोखे) च्या माध्यमातून खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

तसेच इलेक्ट्रॉल बॉन्ड ही कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली आहे. आता, तेच या खंडणी प्रकरणाचे करविते असल्याचा आरोप देखील गांधी यांनी यावेळी केला. शुक्रवारी भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत दाखल झाली. शहरात यात्रा काढून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना संबोधले, त्यानंतर भिवंडी सोनाळे येथे येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणाकडून कंपन्यांना कारवाईची भीती दाखवली जात आहे. त्यांच्यावर दबाव टाकून त्या कंपन्यांकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड याच्या माध्यमातून भाजप खंडणी उखळते. याचे उदाहरण म्हणजे शेल कंपनी आहे. बांधकाम तसेच इतर अशी मोठी कंत्राटे ज्या कंपन्याना देण्यात आली, त्यांच्याकडूनही निवडणूक रोखे स्वरूपात हफ्ते घेण्यात आले असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच इलेक्ट्रॉल बॉन्ड हा भ्रष्टाचाराचे मोठे कुराण असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

घोटाळ्याची चौकशी करू
भाजपचे सरकार कधी न कधी जाईल आणि आमचे सरकार सत्तेवर येईल. त्यावेळी या घोटाळ्याची चौकशी करून अशी कारवाई करू की यापुढे असे करायची कुणाची हिंमत होणार नाही, असा गंभीर इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला. दरम्यान, ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणा आता देशाच्या राहिलेल्या नाहीत. या यंत्रणा आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करीत आहेत. या या यंत्रणांनी त्यांचे काम केले असते तर इलेक्ट्रॉल बॉन्डहा घोटाळा झालाच नसता, असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. मुळात इलेक्ट्रॉल बॉन्ड ही कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली असून यामुळे तेच या खंडणी प्रकरणाचे करविते आहेत असे संगत, यामध्ये नितीन गडकरी यांचा काहीच संबंध नसल्याचे देखील राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पैशातूनच पक्षात फुट पाडली
भाजपने इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून कामविलेल्या पैशाच्या जोरावर त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस या पक्षात फूट पाडली. तसेच पैसे आणि तपास यंत्रणाकडून दबाब टाकून भाजपने महाराष्ट्रातील सरकार पाडले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

भिवंडीत कॉँग्रेसचे शक्ति प्रदर्शन
भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने भिवंडी शहरातील रस्त्यांवर जागोजागी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक आणि पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. तसेच यात्रेच्या स्वागतासाठी चौकाचौकात कार्यकर्त्यांचे जथे जमले होते. यामुळे यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केल्याचे चित्र दिसून आले. देशात सरकार आल्यावर जातनिहाय गणना आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच देशातील विविध कंपन्याने संस्थांचाही सर्वेक्षण करण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी यावेळी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR