मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकारणातला धुरंदर आणि चाणक्य असल्याचे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केले. त्या माणसाला प्रस्थापितांनी अनेक वेळा घेरण्याचा प्रयत्न केला. पण त्या माणसाचा आम्ही अभिमन्यू होऊ दिला नाही आणि भविष्यात देखील होऊ देणार नाही असे खोत म्हणाले.
भारतीय जनता पक्ष हा गावगाड्यांमध्ये काम करणारा पक्ष आहे. त्यांनी एका गावगड्यात काम करणा-या माणसाला उमेदवारी दिली आणि मी जिंकून आलो असेही खोत म्हणाले. आमच्या नऊच्या नऊ जागा जिंकून आल्या. जनतेला बरे वाईट कळते. चांगले निर्णय सरकारने घेतले आहेत. शेतक-यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जनता फार खुश असल्याचे खोत म्हणाले.
हिंदू संस्कृतीत कोणतेही काम करायचे असेल तर श्री गणेशाचे दर्शन घेऊन काम करायचे असते, म्हणून आज सकाळी मी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्याला साकडे घातले की यावर्षी चांगला पाऊस पडू दे, यावर्षी धन धान्याची रास उभी राहू दे आणि पिकाला सोन्याचा भाव मिळू दे असे साकडे घातल्याचे खोत म्हणाले. पडक्या घराचे कोणी मालक होत नाही. त्यामुळं लक्षात आले त्या वाड्यातल्या लोकांना, की इथे चांगला निवारा मिळू शकतो म्हणून ते इथे आल्याचे खोत म्हणाले.