13.6 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात सर्वांधिक शेतकरी आत्महत्या

महाराष्ट्रात सर्वांधिक शेतकरी आत्महत्या

महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला यांचा हल्लाबोल जनतेचे प्रश्न सोडवण्यात महायुती अपयशी

चंद्रपूर : भाजपाचे सरकार शेतकरी विरोधी असून, सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. निर्यात करु शकत नाही आणि सरकार काहीच पावले उचलत नाही. समस्यांच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे पण भाजपा सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. टेंडर काढणे, भ्रष्टाचार आणि पैसा वसुली एवढेच सरकारचे काम सुरु आहे, या शब्दांत प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी हल्लाबोल सरकारवर केला.

प्रदेश काँग्रेसची विभागीय आढावा बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली असून २९ प्रकल्प गुजरातला पळवले आहेत. प्रकल्प गेला नाही असे देवेंद्र फडणवीस छाती फोडून सांगत असले तरी १८ हजार कोटी रुपयांचा सोलर पॅनलचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात गुंतवणूक होणारे ३ लाख २८ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे काम केले आणि गुजरातचे ड्रग महाराष्ट्र आणून तरूणांना बरबाद केले आहे. ५ लाख कोटी रुपयांच्या जमिनी गुजराती उद्योगपतींच्या खिशात घातल्या आहेत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

भाजप दुतोंडी साप : वडेट्टीवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील त्यांच्या भाषणातून लाडकी बहीण योजनेवर टीका केली आणि महाराष्ट्रात मात्र तीच योजना मोठ्या जोशात सुरु आहे. महाराष्ट्रात एक बोलायचे व झारखंडमध्ये दुसरे बोलायचे हा दुटप्पीपणा आहे. भारतीय जनता पक्ष दुतोंडी साप असल्याचे यातून उघड झाले आहे, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला. आढावा बैठकीवेळी विदर्भातून मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला तसेच भाजपाच्या भ्रष्ट सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

राज्याच्या ७६ टक्के भागात दुष्काळ : पटोले
राज्याच्या ७६ टक्के भागात दुष्काळ आहे. अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतक-यांना मदत दिली पाहिजे, पण भाजपा सरकारने तेलंगणाला ४ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु महाराष्ट्राला मात्र फुटकी कवडीही दिली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जाणिवपूर्वक शेतक-यांवर अन्याय करत आहे. भाजपा युती सरकार सर्व आघाड्यांवर फेल आहे पण भ्रष्टाचारात मात्र अग्रेसर आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR