भूम : प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील १२ शेतकरी दोन बैलगाड्या घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व शासनाला शेतकरी हाच कुणबी मराठा आहे, हे दाखवून देण्यासाठी पंढरपूर ते अंतरवली सराटी गावाकडे निघाले आहेत. या शेतक-यांचे भूम शहरात मराठा समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दुस-यांचा आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील चळे येथील १२ शेतकरी दोन बैलगाड्या घेऊन अंतरवली सराटी गावाकडे निघालेले आहेत. भूम शहरात या बैलगाड्या दाखल होताच भूम शहरातील मराठा समाज बांधवांनी हलगी, ढोल ताशा वाजवीत या मराठा शेतक-यांचे स्वागत केले.
सुलतानी सरकारला कुणबी मराठा हाच कुणबी व मराठा शेतकरी आहे, हे अद्यापही लक्षात येत नसल्याने या सरकारला लक्षात आणून देण्यासाठी आम्ही शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून, आमचे शेतातले काम बाजूला ठेवून, आम्ही शेतकरी मराठा कुणबी मराठा आहोत, हेच दाखवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असे बैलगाडी घेऊन जाणारे शेतकरी पांडुरंग खिलारे यांनी सांगितले.
त्यांच्या सोबत चळे येथील शेतकरी सुरेश मोरे, सिद्धेश्वर खिल्लारे, लिंबराज मोरे, सुरेश मोरे, बाबू खिल्लारे, किसन पाटील, तानाजी घाडगे, संतोष मिसाळ, पांडुरंग खिल्लारे, कांतीलाल मोरे, बिबीशन मोरे, गणेश कदम आदी शेतकरी बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी बैलगाड्या घेऊन निघाले आहेत.