30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसोलापूरकरकंब परिसरात दुष्काळात बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

करकंब परिसरात दुष्काळात बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

करकंब : करकंब परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईला सामोरे जातानाच्च एप्रिल छाटण्या कराव्या लागत असल्याने टँकरने विकतचे पाणी घालून बागा जगवाव्या लागत आहेत.

करकंबसह परिसरातील जाधववाडी, पेहे, नेमतवाडी आदी गावांमध्ये द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. बार्डी, जाधववाडी व करकंबच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी तर लाखो रुपयांची कर्ज प्रकरणे करून उजनीच्या डाव्या कालव्यावरून जलवाहिन्या करत द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे. परंतु यावर्षी उजनीच्या पाण्याचे हुकलेले नियोजन आणि तीव्र दुष्काळी परिस्थिती याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

द्राक्ष हंगाम संपताच शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करताना बागांची एप्रिल (खरड) छाटणी करावी लागते. या छाटणीनंतरच काडी तयार होत असल्याने पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. परंतु सध्या शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांचे बोअर आटल्याने त्यांना टैंकरने विकतचे पाणी घालून बागा जगवाव्या लागत आहेत तर बहुतांश शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरची पाणीपातळी खालावल्याने उपलब्ध असणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत बागा कशा जगवायच्या, या चिंतेने ते ग्रासले आहेत.

अनेक शेतकऱ्यांकडे शेततळी असून त्यातील पाण्यावरच त्यांची भिस्त आहे. हे पाणी संपल्यावर पुढे काय, हा प्रश्नही त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे. त्यातच सध्या तापमानाचाही पारा वाढत असल्याने यावर्षी काळी कशी तयार होणार आणि पुढील हंगाम कसा जाणार, ही चिंता आतापासूनच लागून राहिली आहे.शेतातील पाण्याचे स्रोत आटल्याने सध्या टँकरने विकत पाणी आणून शेतकरी द्राक्षबागा जगवीत आहेत. यासाठी स्वतःचा ट्रॅक्टर असूनही शेतकर्‍यांना दररोज पाचशे रुपयांचे डिझेल आणि प्रतिक्षेप तीनशे रुपये याप्रमाणे तीन खेपांच्या पाण्यासाठी नऊशे रुपयांप्रमाणे प्रतिदिन चौदाशे रुपयांचा खर्च येतो. पाऊस पडेपर्यंत हा खर्च करावा लागणार आहे. सध्या खरड छाटणी केलेली असतानाच बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे शेततळ्यात साठवलेल्या पाण्यावरच शेतकर्‍यांची पूर्ण भिस्त आहे. पण पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरेल असे वाटत नाही.

सर्वच बोअरची पाणीपातळी कमालीची घटली असून, केवळ पंधरा ते वीस मिनिटेच चालतात. त्यामुळे द्राक्षबागा सध्या अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. या भागातील पाणीप्रश्न कायमचा मिटवायला असेल तर काहीही करून गावतळ्यात पाणी आणायलाच हवे. अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR