35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसोलापूरमहात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळास निधी वाढवण्याची मागणी

महात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळास निधी वाढवण्याची मागणी

सोलापूर : महाराष्ट्र शासनातर्फे लिंगायत समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर आर्थिक मंडळास दिलेल्या ५० कोटी रुपयांचा निधी अगदी तुटपुंजा आहे. लिंगायत समाजातील आर्थिक उन्नतीसाठी सरकारने किमान अतिरिक्त निधी ५०० कोटी दिला पाहिजे, असे मत लिंगायत समाजातील सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी व्यक्त केले.

सोलापूर शहर व जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लिंगायत समाज हा बहुतांशी व्यापार व उद्योजक वर्गात मोडतो. मात्र यामध्ये छोट्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. सरकारने जाहीर केलेला ५० कोटी रुपयांचा आर्थिक निधी महाराष्ट्रातील कुठल्याही एका जिल्ह्यातील लिंगायत बांधवांसाठी पुरणार नसून त्याद्वारे लिंगायत समाजाची आर्थिक प्रगती साधता येणार नाही. सरकारने लिंगायत समाजातील उद्योजक व व्यावसायिक वाढीसाठी जास्तीत जास्त भरघोस निधी देणे गरजेचे आहे. लिंगायत समाजातील उद्योजक व व्यावसायिकांसाठी स्वतंत्र छोटी औद्योगिक वसाहत स्थापन करायला हवी असे देखील मत व्यक्त केले.

रोजगार उपलब्ध नसल्याने लिंगायत समाजात बेरोजगारी वाढत चालली आहे. लिंगायत समाजातील उद्योजक व व्यावसायिकांसाठी स्मॉल स्केल इंडस्ट्री सरकारने उभारण्याची गरज आहे. लिंगायत समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या उत्पादनांचे दरवर्षी मोफत प्रदर्शन सरकारतर्फे भरवण्यात आले पाहिजे अशी मागणी होत आहे. सरकारनें महात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळास भरघोस निधी द्यावा. महामंडळास दिलेला निधी लिंगायत समाजातील गरीब वर्गातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचवण्यासाठी उपाययोजना करावी.

लिंगायत समाजातील लोकांसाठी लिंगायत विद्यापीठाची स्थापना करून त्याद्वारे औद्योगिक, धार्मिक, स्पर्धात्मक परीक्षांचे शिक्षण मिळावे. लिंगायत समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पदरात शिक्षण मिळावे. महाराष्ट्रातील विकसनशील शहरांमध्ये लिंगायत समाजातील उद्योजक व व्यावसायिकांमध्ये वाढ होण्यासाठी सर्व प्रशासकीय स्तरांवर उद्योजकांसाठी पूरक धोरण ठरवावे. त्यासाठी एक खिडकी योजना अमलात आणावी. व्यापार व उत्पादन निर्मिती करणाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी विविध योजना सरकारने अमलात आणल्या पाहिजेत.

मंगळवेढा येथे उभारण्यात येणारे महात्मा बसवेश्वर स्मारकाचे अद्यापही काम सुरू झालेले नाही. ते लवकरात लवकर सुरू करावे. महात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळ तत्काळ कार्यान्वित करावे. सोलापुरात नव्याने उभारणाऱ्या आयटी पार्क व इतरही उद्योगांमध्ये लिंगायत समाजातील तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून द्यावा. महात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळाला दिलेला निधी अपुरा असून किमान ५०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.अशी मागणी लिंगायत समाजातून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR