अमृतसर : धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अमृतसर-दिल्ली महामार्गावर अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. पंजाबमधील खन्ना येथे ही दुर्घटना घडली आहे. या मार्गावर सध्या धडकलेल्या आणि खराब झालेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पंजाबच्या लुधियाना येथील खन्ना भागात अनेक वाहने एकमेकांवर आदळली असून धुक्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला रस्त्यांवरील दृश्यमानता कमी झाली आहे. या प्रकरणातील अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे.
या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी थांबलेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानीसोबतच आर्थिक हानीही झाल्याची शक्यता आहे.