नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागची गणना जगातील सर्वांत आक्रमक सलामीवीर फलंदाजांमध्ये केली जाते. वीरेंद्र सेहवागने आपल्या कारकीर्दीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. पण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वीरेंद्र सेहवागला मोठा सन्मान दिला आहे. सेहवागचा आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, सेहवागशिवाय भारतीय महिला संघाची माजी खेळाडू डायना एडुल्जी आणि श्रीलंकेचा दिग्गज अरविंदा डी सिल्वा यांचाही ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण खेळाडूंची संख्या ११२ झाली आहे.
वीरेंद्र सेहवाग आणि डायना एडुल्जी यांच्यापूर्वी सात भारतीय खेळाडूंना हा सन्मान मिळाला आहे. २०२१ मध्ये विनू मंकड यांना या यादीत स्थान मिळाले. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला जुलै २०१९ मध्ये हा सन्मान मिळाला होता. राहुल द्रविडला २०१८ मध्ये आणि अनिल कुंबळेला २०१५ मध्ये हा सन्मान मिळाला होता. बिशनसिंग बेदी आणि सुनील गावसकर यांना २००९ मध्ये ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समाविष्ट करण्यात आले. २०१० मध्ये कपिल देव यांना हा सन्मान देण्यात आला होता.
‘हॉल ऑफ फेम’मध्ये भारतीयांचा समावेश
बिशनसिंग बेदी- २००९, सुनील गावसकर- २००९, कपिल देव-२०१०, अनिल कुंबळे – २०१५, राहुल द्रविड- २०१८, सचिन तेंडुलकर- २०१९, विनू मंकड- २०२१, डायना एडुल्जी- २०२३, वीरेंद्र सेहवाग- २०२३