लखनौ : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील फटाका मार्केटमध्ये आग लागली. आग इतकी भीषण होती की अनेक दुकाने जळून खाक झाली असून या अपघातात १२ हून अधिक जण गंभीर भाजले गेले आहेत. सर्वांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गोपाळबाग परिसरात हा बाजार होता. या घटनेत अनेक वाहने ही जाळून खाक झाल्याचे वृत्त आहे.
राजा कसबा येथील माँट रोडवर असलेल्या गोपाळ बागेत फटाक्यांची २४ तात्पुरती दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. दिवाळीच्या दिवशी दुपारी येथे खरेदीसाठी लोक आले होते. दरम्यान, फटाका मार्केटमध्ये अचानक आग लागली. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके असल्याने मोठी दुर्घटना घडली असून सुमारे १५ दुकानांमध्ये विक्रीसाठी तयार केलेले लाखो रुपये किमतीचे फटाके फुटले. आग लागल्याचे समजताच बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. लोक इकडे तिकडे धावू लागले. १२ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी नरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, आगीच्या कारणाचा शोध सुरू आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली जात आहे. जळालेल्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. यापैकी चार जणांना आग्रा येथे रेफर करण्यात आले आहे. गंभीर भाजलेल्या काही तरुणांवर उपचार सुरू आहेत.