तेलअवीव : हमासविरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली सैन्याने गाझा रुग्णालयातून मुलांना बाहेर काढण्याची तयारी दर्शवली आहे. इस्रायली सैन्याने सांगितले की, ते रविवार दि. १२ नोव्हेंबर रोजी गाझामधील सर्वात मोठे हॉस्पिटल अल शिफामधून लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी तयार आहेत.
इस्रायल सैन्याचे मुख्य प्रवक्ते रिअर एडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले की, अल शिफा कर्मचा-यांच्या विनंतीनुसार इस्रायली सैन्य मुलांना रुग्णालयातून बाहेर काढण्यास मदत करेल. पॅलेस्टिनी अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, इंधन संपल्याने दोन नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर इतर अनेक चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला आहे.
गाझा सीमा प्राधिकरणाने सांगितलं की इजिप्तमधील राफा क्रॉंिसग शुक्रवारी (१० नोव्हेंबर) बंद केल्यानंतर, ते रविवारी (१२ नोव्हेंबर) परदेशी पासपोर्ट धारकांसाठी पुन्हा उघडले जाईल. रुग्णालयाचे संचालक मुहम्मद अबू सल्मिया यांनी अल जजीरा टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांचे संरक्षण करणे ही त्यांची पहिली प्राथमिकता आहे. अबू सल्मिया म्हणाले, आम्ही रेड क्रॉसशी संपर्क साधला आणि त्यांना कळवले की आमच्याकडे पाणी, ऑक्सिजन, इंधन आणि इतर सर्व काही संपले आहे. त्यामुळे नवजात बाळ, अतिदक्षता विभागात असलेले रुग्ण आणि जखमी लोकांचा वीज नसल्यामुळे मृत्यू होऊ शकतो.