22.6 C
Latur
Thursday, August 21, 2025
Homeराष्ट्रीयनसबंदी केल्यानंतरही जन्माला आले पाचवे मुलं

नसबंदी केल्यानंतरही जन्माला आले पाचवे मुलं

९ वर्षांनंतर महिलेला मिळाला न्याय

बाडमेर : बाडमेरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, नसबंदी केल्यानंतर देखील पाचवं मुलं जन्माला आल्याने महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. तब्बल ९ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर या महिलेला न्याय मिळाला आहे. मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी यांची अधिकृत सरकारी गाडी जप्त करून या महिलेला चार लाख रुपये देण्याचे आदेश बाडमेर येथील न्यायालयाने दिले आहेत. पपु देवी असे या महिलेचे नाव आहे.

पपु देवी यांना तब्बल ९ वर्ष प्रशासकीय यंत्रणांविरोधात न्यायालयीन लढाई लढल्यानंतर अखेर यश मिळालं आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी यांची अधिकृत गाडी जप्त करून या महिलेला चार लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता पपु देवी यांना चार लाख रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे प्रकरण २००८ सालचे आहे, बाडमेरमधील रहिवासी असलेल्या पपु देवी यांनी नसबंदीचे ऑपरेशन केले होते. त्यांना आधीच चार मुले होती, मात्र नसबंदीचे ऑपरेशन केल्यानंतर देखील त्या गर्भवती राहिल्या, त्यांनी पाचव्या मुलाला जन्म दिला. याविरोधात त्यांनी आरोग्य विभाग आणि जबाबदार डॉक्टरांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. आपल्या पाचव्या मुलाच्या पालन पोषणाचा खर्च हा आरोग्य विभागाकडून मिळावा अशी त्यांनी मागणी केली होती.

त्यानंतर २०१६ साली या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिला होता की, या महिलेला तिच्या मुलाच्या पालनपोषणासाठी खर्च देण्यात यावा, मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील या महिलेला एकही रुपयाची मदत मिळाली नाही. त्यानंतर तीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली, यावेळी मात्र न्यायालयाने या प्रकरणात मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी यांची अधिकृत गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, त्यातून या महिलेला चार लाखांची मदत करावी असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयावर पपू देवी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे, त्यांना आता चरा लाखांची मदत मिळणार आहे.