लखनौ : बिग बॉस विजेता बनल्यानंतर चर्चेत आलेला युट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडला आहे. नोएडा पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला असून एल्विश यादव याच्यावर तस्करी तसेच रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. नोएडा पोलिसांना सेक्टर ४९ मध्ये छापा टाकून पाच लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी येथून पाच कोब्रा साप देखील जप्त केले असून यासोबतच पोलिसांना सापांचे विष देखील सापडले आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिग बॉस विजेता एल्विश यादव याचे नाव देखील समोर आले आहे. पोलिसांनी एल्विश यादव विरोधात एफआयआर दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका एनजीओने स्टिंग ऑपरेशन करत नोएडा पोलिसांकडे तक्रार केली होती. एफआयआर कॉपी नुसार एल्विश यादव याच्या नावाचा आरोपींमध्ये समावेश आहे. ही एफआयआर पीपल फॉर अॅनिमल वेलफेयर ऑफिसर पदावर काम करत असलेल्या गौरव गुप्ता यांनी दाखल केली होती.
..तर सर्व जबाबदारी घेण्यास तयार
एफआयआर दाखल झाल्यानंतर एल्विश यादव याने शुक्रवारी आपले स्पष्टीकरण सादर केले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हीडीओमध्ये एल्विश यादव म्हणाला की, मी सकाळी उठलो. एल्विश यादव याला ड्रग्जसह पकडण्यात आल्याच्या बातम्या माझ्या विरोधात पसरवल्या जात आहेत, हे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. यात एक टक्काही तथ्य नाही. मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. मी यूपी पोलिस, प्रशासन, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन करतो की, जर यात माझा १ टक्का देखील सहभाग आढळला तर मी सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहे.