30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी मंत्री डॉ. मुंदडा यांच्या घरावर दगडफेक

माजी मंत्री डॉ. मुंदडा यांच्या घरावर दगडफेक

विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

वसमत : वसमत येथे माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे यामध्ये घराचे किरकोळ नुकसान झाले. कुरुंदा येथे गावक-यांनी मंगळवारी (ता. ३१) पहाटेपासूनच नवीन बसस्थानकासमोर ठाण मांडले असून गिरगावात सलग दुस-या दिवशी विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. तेलगाव पाटी येथे एका तरुणाने पेटवून घेतले असून त्यात तो ७० टक्के भाजला आहे. या तरुणावर उपचार सुरू आहेत.

या आंदोलनाची धग आणखी वाढली असून आज सकाळीच माजी मंत्री तथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. घराचे नुकसान झाले आहे. वसमतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
त्यानंतर आज सकाळीच कुरुंदा येथील गावक-यांनी नवीन बसस्थानकावरील मुख्य रस्त्यावर ठाण मांडले. आरक्षण मिळेपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका गावक-यांनी घेतली असून सकाळचा नाश्­ता देखील रस्त्यावर बसूनच घेतला. तसेच जनावरे रस्त्यावर आणून त्यांचे दूध रस्त्यावरच काढले यामुळे वसमत मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वसमत तालुक्यातील गिरगाव येथील बहिर्जी स्मारक विद्यालयातील २३० विद्यार्थ्यांनी सलग दुस-या दिवशी परीक्षेवर बहिष्कार टाकला. आज गणित (भाग दोन) या विषयाचा पेपर होता. मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही. आरक्षणाची घोषणा होईपर्यंत परीक्षा देणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी जाहीर केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR