22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरमाजी सभापती दिलीप घाडगेसह चौघे न्यायालयीन कोठडीत

माजी सभापती दिलीप घाडगेसह चौघे न्यायालयीन कोठडीत

पंढरपूर – एका विवाहितेवर दुष्कर्म व त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल केल्याच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी सभापती दिलीप घाडगे याच्यासह चौघेजण येथील न्यायालयात हजर झाले. या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दिलीप घाडगे, सुबोध वाघमारे, सोहम लोखंडे व लखन वाघमारे अशी या चौघांची नावे आहेत. तालुका पोलीस ठाण्यात सुमारे अडीच महिन्यापूर्वी एका पीडित विवाहितेने फिर्याद दाखल केली होती. ती अंघोळ करीत असताना दत्तात्रय रेवणसिद्ध रणदिवे याने मोबाइलमध्ये व्हिडिओ काढला. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर उसाच्या पिकात तिच्या इच्छेविरूद्ध दुष्कर्म केले. तसेच दुष्कर्म करताना पुन्हा व्हिडिओ काढून गावातील लोकांना पाठविला. दिलीप घाडगे यानेही हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप पीडितेने फिर्यादीत केला होता. त्यानुसार विनयभंग, दुष्कर्म, माहिती तंत्रज्ञान व इतर कलमान्वये गुन्हा नोंद झाला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

यातील मुख्य संशयित दत्तात्रय रणदिवे याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरलप्रकरणी दिलीप घाडगे व इतर पाचजणांची नावे समोर आल्याने तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना अटक न करता कायदेशीर तरतुदींनुसार नोटीस देऊन सोडले होते. या अनुषंगाने घाडगे याच्यासह चौघेजण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी. बागूल यांच्यासमोर हजर झाले. त्यांच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे सदर चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आरोपींच्यावतीने अ‍ॅड. एम. बी. शिंदे तर सरकारतर्फे अ‍ॅड. पठाण यांनी काम पाहिले. याबाबतची माहिती समजताच अनेक राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थांनी न्यायालयात गर्दी केली. त्यामुळे तालुका पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक ओलेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR