लातूर : प्रतिनिधी
हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुर्गाप्पा काशिनाथप्पा खुमसे यांचे दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०५ वर्षांचे होते. स्व. मुर्गाप्पा खुमसे यांच्या पार्थिवावर उद्या दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता रेणापूर तालुक्यातील बेलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते लातूर शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापूरे यांचे चुलते होते.
कॉ. मुर्गाप्पा मसे यांच्यावर आर्यसमाजाच्या चळवळीचा व स्वामी रामानंद तीर्थ, पू. बाबासाहेब परांजपे यांचा प्रभाव होता. निजामाच्या जुलमी राजवटीविरोतील बंडात खुमसे यांचा सहभाग होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग अग्रस्थानी होता.
म. गांधीच्या १९४२ च्या ‘चलेजाव’ या चळवळीत त्यांनी उडी घेतली होती. या शिवाय कॉ. मुर्गाप्पा खुमसे यांनी गोवा मुक्ति आंदोलन व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग होता. आज तगायत मराठवाडा विकास आंदोलनातही ते सहभागी होते. वयाच्या १०५ वर्षांपर्यत ते सामाजीक चळवळीशी जोडले गेले होते.