36.1 C
Latur
Thursday, March 26, 2026
Homeराष्ट्रीयइंधन टंचाई, युद्ध आणि आता सायबर हल्ल्यांची भीती

इंधन टंचाई, युद्ध आणि आता सायबर हल्ल्यांची भीती

चिंतादायक... जगात सर्वठिकाणी अस्थिरतेचे वातावरण इंटरनेट बंद असूनही तुमचा कॉम्प्युटर नाही सुरक्षित

नवी दिल्ली : मध्य-पूर्वेतील युद्ध आता तिस-या आठवड्यात प्रवेश करत असताना एक खळबळजनक माहिती समोर आली असून सायबर हल्ल्याने सुध्दा तोंड वर काढल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. जगाच्या राजकारणात युद्धाची भाषा कधीच नवी नाही. मात्र अलीकडच्या काळात ती अधिक आक्रमक, थेट आणि चिंताजनक होत चालली आहे. इस्रायल-इराण संघर्ष आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील तणाव या दोन स्वतंत्र वाटणा-या घडामोडी प्रत्यक्षात एकाच जागतिक प्रवृत्तीचे प्रतिबिंब आहेत.

संयम संपविलेले आणि नसलेली शक्ती फुगवून दाखवून त्याद्वारे प्रश्न सोडवण्याची फुशारकी मारणारे लोक सत्तेवर बसल्याने त्यांच्या कृतीची जगाला चिंता लागली आहे. दरम्यान जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतावर आणखी नव्या हल्ल्याचे सावट उभे राहले आहे. या हल्ल्याला सायबर वॉरफेअर (सायबर युद्ध) असे म्हटले जात आहे.

इंटरनेट बंद ठेवले तरी संगणक पूर्णपणे सुरक्षित राहतो, हा समज धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. २०२५ मध्ये भारतातील जवळपास प्रत्येक तीनपैकी एक संगणक वापरकर्ता ऑफलाइन सायबर हल्ल्यांचा बळी ठरल्याचा धक्कादायक खुलासा ‘कॅस्परस्की’च्या अहवालातून झाला आहे. कंपनीने जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान देशात तब्बल ६.४६ कोटी ‘लोकल’ सायबर हल्ले ओळखून रोखले. हे हल्ले प्रामुख्याने इंटरनेटशिवाय पसरवले जाणारे, यूएसबी ड्राइव्ह, बा स्टोरेज आणि इतर रिमूव्हेबल माध्यमांद्वारे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारत ‘लोकल सायबर धोका’ सर्वाधिक असलेल्या जगातील पहिल्या ८० देशांमध्ये समाविष्ट झाला आहे.

स्वत:ला कसे सुरक्षित ठेवाल?
अनोळखी व्यक्तीचे किंवा संशयास्पद पेनड्राइव्ह आपल्या लॅपटॉप/कॉम्प्युटरला लावू नका. कॉम्प्युटरमध्ये नेहमी अपडेटेड अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ठेवा. ‘ऑटो-रन’ फीचर बंद ठेवा, जेणेकरून पेनड्राइव्ह लावताच व्हायरस स्वत:हून सक्रिय होणार नाही. महत्त्वाच्या फाईल्सचा वेळोवेळी बॅकअप घ्या. अज्ञात फाइल्स उघडण्यापूर्वी स्कॅन करा. संवेदनशील माहिती शेअर करताना खबरदारी घ्या.

धोकादायक ट्रेंड : टीम्स, गुगल ड्राइव्हची नक्कल
वर्क फ्रॉम होम आणि हायब्रिड कामकाजाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगार अधिक सक्रिय झाले आहेत. ‘मायक्रोसॉफ्ट टीम्स’ आणि ‘गुगल ड्राइव्ह’सारख्या लोकप्रिय साधनांची नक्कल करून वापरकर्त्यांना फसवण्याचे प्रकार वाढल्याचेही संशोधनातून समोर आले आहे. अशा बनावट फाइल्स किंवा लिंकद्वारे लॉगिन माहिती, बँकिंग तपशील आणि वैयक्तिक डेटा चोरण्याचे प्रकार घडत असल्याचे ‘कॅस्परस्की’चे आशिया-पॅसिफिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅड्रियन हिया यांनी सांगितले. ‘कॅस्परस्की सिक्युरिटी नेटवर्क’च्या आकडेवारीनुसार, देशातील २९.८ टक्के वापरकर्त्यांना ऑफलाइन धोके अनुभवावे लागले.