विशाखापट्टणम/चेन्नई/भुवनेश्वर
अक्वान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, ओडिशामध्ये ८०,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सहा जिल्ह्यांमधील शाळा आणि अंगणवाडी केंद्रे १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान बंद राहतील. या चक्रीवादळाचा फटका १० राज्यांना बसण्याची शक्यता असून ७४ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
अक्वान चक्रीवादळ शुक्रवारी दुपारच्या सुमारास आंध्र प्रदेशातील नरसपूर आणि ओडिशामधील पुरी दरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वा-याचा वेग ताशी ९० ते ११० किलोमीटर असू शकतो. यापूर्वी, हे चक्रीवादळ गुरुवारी धडकेल असा अंदाज वर्तवला होता. या चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, परिस्थिती हाताळण्यासाठी नौदल आणि इतर यंत्रणा सज्ज आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने गुरुवारी तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
१० राज्यांत खबरदारी
चक्रीवादळ अक्वानचा सर्वाधिक परिणाम आंध्र प्रदेशात होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, १९ आणि २० नोव्हेंंबर रोजी किनारी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. २० नोव्हेंबर रोजी हे वादळ नेल्लोर आणि विशाखापट्टणमदरम्यान किना-यावर धडकू शकते.या काळात वा-याचा वेग ताशी १०० ते ११० किमी आणि झोतांचा वेग ताशी १२० किमीपर्यंत पोहोचू शकतो. किनारी जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या १३ आणि एसडीआरएफया ११ पथके तैनात आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि शेतक-यांना पिके सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
२१ नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज
२१ नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गंजाम, गजपती, रायगडा, कोरापुट आणि मलकानगिरी यांसारख्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये अधिक परिणाम होऊ शकतो. सखल भागांत पाणी साचण्याचा आणि डोंगराळ भागांत भूस्खलनाचा धोका आहे. सरकारने ८ जिल्ह्यांतील २ लाख ४ हजारांहून अधिक लोकांची ओळख पटवली आहे. गरज पडल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल. प्रशासनाने मदत केंद्रे सज्ज ठेवण्याची आणि संवेदनशील गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी केली आहे. हरभंगी आणि बदनाला धरणांतून पाणी सोडले जात आहे, जेणेकरून मुसळधार पावसाचे पाणी साठवण्यासाठी जागा उपलब्ध राहील. समुद्रात १४ मीटरपेक्षा उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
















