नागपूर/जळगाव : प्रतिनिधी
नागपूर आणि जळगावात कोट्यवधी रुपये किमतीचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आली. नागपुरात जप्त केलेल्या सोने-चांदीची किंमत १४ कोटी तर जळगावात जप्त केलेल्या सोने, चांदीची किंमत ५ कोटी ५९ लाख ६१ रुपये आहे. यामुळे दोनच दिवसांत १०० कोटींपेक्षा जास्त किंमतीचे सोने, चांदी जप्त करण्यात आले आहे.
नागपुरात तब्बल १७ किलो सोने आणि ५५ किलो चांदी सापडली. हा सर्व मुद्देमाल एकूण १४ कोटी रुपयांचा आहे. नागपूर विद्यापीठ समोरील रस्त्यावर नाकाबंदी सुरू असताना गुजरातमधील ‘सिक्वेल लॉजिस्टिक्स’ या पुरवठा कंपनीची गाडी पोलीस आणि निवडणूक यंत्रणेच्या पथकाने थांबवली. त्यावेळी व्हॅनमध्ये १७ किलो सोने दागिने स्वरूपात आणि ५५ किलो चांदी प्लेट्स स्वरूपात आढळली.
सोने-चांदी विदर्भातील सराफांचे
सोने व चांदी विदर्भातील वेगवेगळ्या सराफा व्यावसायिकांच्या ऑर्डरनुसार त्यांच्या प्रतिष्ठानात पुरवठ्यासाठी नेले जात होते. सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्लेट्स नागपूरसह अकोला, अमरावती अशा विदर्भातील वेगवेगळ्या शहरातील सराफा व्यावसायिकांनी ऑर्डर स्वरूपात बोलावल्याची माहिती आहे. त्या संदर्भातील कागदपत्रे, बिल सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीकडे होते. मात्र आचारसंहितेच्या काळात लागणारी परवानगी त्या कंपनीकडे नव्हती. त्यामुळे तपासणी पथकाने संबंधित सोन्याचे दागिने आणि चांदीच्या प्लेट्स जप्त केल्या आहेत. त्या संदर्भात आयकर विभाग तसेच जीएसटी विभागालाही सूचना देण्यात आली आहे.
जळगावात दागिने जप्त : जळगावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ कोटी ५९ लाख ६१ हजाराचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले. जळगावातील रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदी करत ही कारवाई केली. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालमध्ये ४ किलो सोने व ३४ किलो चांदीचा समावेश आहे. जळगाव शहरातील तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे.