जळगाव : प्रतिनिधी
जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर अगदी ७० हजार पार पोहोचले आहेत. लग्नसमारंभात किंवा आता गुढीपाडव्यासारख्या सण-वाराला सोने खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
२४ तासांत सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे आजचे भाव ७० हजार १०० रुपये प्रतितोळे जीएसटीसह नोंदवले गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत सोन्याच्या दराचा हा सगळ्यात उच्चांकी भाव आहे.
सोने-चांदीची खरेदी करणा-यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे. २४ तासांत दोन हजारांनी वाढलेल्या सोने खरेदीकडे लोक पाठ फिरवणार का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोन्याच्या दराने ७० हजारांचा आकडा पार केल्यानंतर खरेदी करण्याचा कल कमी होताना पाहायला मिळत आहे.
ग्राहकांची सोनं खरेदीकडे पाठ
सोन्याच्या दरात तब्बल दोन हजारांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. वाढत्या सोन्याच्या दराने सत्तरी गाठल्यानंतर ग्राहकांनी मात्र सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील फेडरल बँकांनी व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहण्यात येत आहे.