पुणे : राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार गारपीट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड तर नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपीट झाली. नाशिकच्या ग्रामीण भागात देखील गारपिटीसह पाऊस झाला आहे.
पूर्वेकडून येणा-या बाष्पयुक्त वा-यांचा पश्चिमेकडून येणा-या वा-यांशी संयोग होऊन कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २६ तारखेला उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे.
येत्या तीन तासांत पावसाची शक्यता
येत्या तीन तासांत देखील काही ठिकाणी मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासोबत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे यासह मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, बीड, जालना तर विदर्भात बुलडाणा, अकोला जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.