27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयहमास, इस्रायलमध्ये संघर्ष सुरू; युद्धविराम करार संपुष्टात

हमास, इस्रायलमध्ये संघर्ष सुरू; युद्धविराम करार संपुष्टात

जेरुसलेम : हमास आणि इस्रायलमधील युद्धविराम करार संपुष्टात आला असून पुन्हा हमास आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. तसेच युद्ध पुन्हा सुरू झाल्याचे इस्रायलने म्हटले आहे. हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धविराम कराराचा गुरुवारी सातवा दिवस होता. यानंतर शुक्रवारी हा करार संपला. करार संपण्याच्या काही वेळापूर्वीच ईरायालाने हवाई हल्ला सुरू केला. युद्धविराम पुढे जाऊ शकेल, अशी आशा होती. अमेरिका, कतार आणि इजिप्त सतत मध्यस्थी करत होते पण हा करार पुढे होऊ शकला नाही.

गाझामधील राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे की, दक्षिण गाझामध्ये इस्रायलने हवाई हल्ले सुरु केले आहेत. मंत्रालयाने टेलिग्रामवर ही माहिती दिली आहे. उत्तर गाझामध्येही अनेक स्फोट ऐकू आल्याचे काही माध्यमांनी वृत्त दिले आहे. गाझा शहराच्या उत्तर-पश्चिम भागातही गोळीबार झाला आहे. गेल्या शुक्रवारी हमास आणि इस्रायलमध्ये युद्धविराम कराराची घोषणा करण्यात आली. सात दिवस चाललेल्या या करारात गुरुवारपर्यंत हमासने ११० इस्रायली ओलीसांची सुटका केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलमध्येही हमासने क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, शुक्रवारी सकाळी ७ वाजता युद्धविराम संपला आणि अर्ध्या तासानंतर हमासकडून हल्ला झाला. त्याचबरोबर हा हल्ला इस्रायलनेच सुरू केल्याचा दावाही हमासने केला आहे. आता इस्रायलवरही दबाव आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी इस्रायलला भेट दिली, ज्यामध्ये ब्लिंकन यांनी इस्रायलला सांगितले की आता गाझामधील त्यांच्या कारवायांनी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचे पालन केले पाहिजे. उत्तर गाझामध्ये ज्या प्रकारे लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले, तसे दक्षिण गाझामध्ये होऊ नये, असे अमेरिकेने म्हटले आहे.

१४ लोकांचा मृत्यू
गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शुक्रवारी सकाळी युद्धविराम संपल्यानंतर १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझाची बहुतांश लोकसंख्या सध्या दक्षिणेत आहे आणि येथून स्थलांतराचा कोणताही मार्ग नाही. अशा स्थितीत इस्रायलने येथील हमासच्या ठिकाणयांवर हल्ला केल्यास मोठ्या प्रमाणात नागरिक मारले जाण्याची दाट शक्यता आहे.

आकाशात काळ्या धुराचे लोट
सात दिवसांच्या युद्धबंदीनंतर गाझामध्ये पुन्हा एकदा गोळीबार सुरु झाला आहे. हवाई हल्ल्यांसोबतच आकाशात लहान शस्त्रांचे हल्लेही होत आहेत. आकाशात काळ्या धुराचे लोट आणि उडणाऱ्या ड्रोनच्या आवाजांनी गाझामध्ये पुनरागमन केले आहे. गाझामध्ये फक्त नष्ट झालेल्या इमारती दिसत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR