27.3 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeमहाराष्ट्र‘मुख्याध्यापिकेच्या ...उलट्या बोंबा’!

‘मुख्याध्यापिकेच्या …उलट्या बोंबा’!

सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला जखमांचा दावा पोलिसांसोबत गुप्त बैठकही झाली?

बदलापूर : बदलापूर अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलने सुरू आहेत. या घटनेची दखल स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन तातडीची सुनावणी देखील घेतली. हायकोर्टाने आपल्या सुनावणीत राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले होते, लोकांनी रस्त्यावर उतरण्यापर्यंतची वाट तुम्ही पाहाता का, अशा शब्दात सरकारला फटकारले. याचदरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

१३ ऑगस्टला बदलापूरमधील एका शाळेत सफाई काम करणा-या आरोपी अक्षय शिंदेंने दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार केले. यातील एकीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाल्याची बाब समोर आली. १६ ऑगस्ट रोजी पालक तो अहवाल घेऊन शाळेत गेले. मात्र शाळेने सायकलमुळे जखम झाली असावीकिंवा शाळेबाहेर काही घडले असेल, असा दावा शाळेतील मुख्याध्यापिकेने केला. तसेच डॉक्टरांनी दिलेला अहवाल देखील फेटाळून लावला, असा दावा पीडितेच्या पालकांनी केला आहे.

महिला पोलिसांची गुप्त बैठक
शाळेतील बदलापूरचं प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठी एका महिला पोलिसाने शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. बदलापूरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे पीडित मुलीच्या पालकांनी म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारी ही महिला पोलिस कोण?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नेमकी घटना काय?
१ ऑगस्टला २४ वर्षीय आरोपीची शाळेत नेमणूक झाली. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अल्पवयीन मुलींसोबत १२ आणि १३ ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचे एका मुलीने सांगितले. गुरूवार १४ ऑगस्ट रोजी पीडित ४ वर्षीय दोन मुलींपैकी एकीने तिच्या आजोबांकडे तिने आपल्या प्रायवेट पार्टजवळ त्रास होत असल्याचे सांगितले तेच तिने तिच्या आईकडेही सांगितले. घाबरलेल्या पालकांनी दुस-या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला त्यांनीही आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचे सांगितले ज्यातून पुढे तिच्यासोबत असेच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचे सांगितले. पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आले होते. पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलिस ठाण्यात दोन नवीन पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR