31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeराष्ट्रीयहेमंत सोरेन यांच्या अटकेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

हेमंत सोरेन यांच्या अटकेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीने अटक करण्यापूर्वीच हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सोरेन यांच्या अटकेमुळे झारखंडमध्ये राजकीय खळबळ उडाली असून हे प्रकरण कोर्टापर्यंत देखील पोहोचले आहे. ईडीच्या समन्सविरोधात हेमंत सोरेन यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. तसेच आज या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र ही याचिका मागे घेत ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

सोरेन यांच्या अटकेविरोधात कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. आम्ही रांची हायकोर्टातील याचिका मागे घेतली असल्याचे सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात कळवले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात उद्या सोरेन यांना दिलासा मिळणार की ईडीकडून झालेल्या अटकेची कारवाई वैध ठरवली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चंपाई सोरेन विधीमंडळ गटनेतेपदी
ईडीने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांच्यावर अखेर अटकेची कारवाई केल्यानंतर सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली. या सर्व घडामोडींमुळे झारखंडमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर आता झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाकडून ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यांनी ४३ आमदारांची पांिठब्याची पत्रेही राज्यपालांना सुपूर्द केली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR