30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्ररावेरमध्ये संमिश्र कौलाचा इतिहास

रावेरमध्ये संमिश्र कौलाचा इतिहास

रावेर : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीत रावेर विधानसभा मतदारसंघ कोणाला मताधिक्य देतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि दोनदा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षा खडसे यांची लढत आता उद्योजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) श्रीराम पाटील यांच्याशी आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर विधानसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना सुमारे ३९ हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

या मतांनी त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. येत्या निवडणुकीत मताधिक्य टिकविण्यासह ते वाढविण्याचेही त्यांच्यापुढे आव्हान असेल. रावेर लोकसभा मतदारसंघाची ओळखच मुळात रावेर विधानसभा क्षेत्रावरून आहे. त्यामुळे रावेर विधानसभा मतदारसंघाचा कौल येणा-या लोकसभेत कसा राहतो, याबद्दल उत्सुकता आहे. रावेर लोकसभेच्या दृष्टीने अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असला तरी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाने आळीपाळीने संमिश्र कौल दिला आहे.

त्यामुळेच रावेर व यावल तालुक्यांचा समावेश असलेल्या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांना आघाडीच्या उमेदवाराला, तर भाजपकडून भावी आमदारांच्या शर्यतीतील इच्छुकांना भाजपच्या रक्षा खडसेंना मताधिक्य देण्याचा प्रयत्न करावा लागेल, अशी स्थिती आहे.

पाटलांची ‘कोरी पाटी’
श्रीराम पाटील यांची राजकारणातील पाटी कोरी आहे. ते उद्योजक असून, त्यांच्या उद्योगातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. त्यांच्या एकूणच प्रचारात विकासकामांवर भर आहे. मोदी सरकारवर कोणतीही टीका न करता जनतेने संधी दिल्यास आपण कोणती विकासकामे करू यावर त्यांच्या प्रचाराचा भर आहे. आमदार शिरीष चौधरी पुढाकार घेऊन प्रचाराचे नियोजन आणि दिशाही ठरवत आहेत.

एकनाथ खडसेही सक्रिय
रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे ही आता प्रचारात सक्रिय झाले आहेत. यावल, फैजपूर, सावदा या भागांत प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे तसेच फोनवरूनही ते कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत, ही रक्षा खडसेंसाठी जमेची बाजू असेल. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्यासाठी उत्सुक पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळेही निष्ठेने पक्षाच्या प्रचारासाठी मेहनत घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी मला निवडून द्या,या मुद्द्यावर खासदार खडसे यांचा जोर आहे.

एकूणच स्वत:चे निवास असलेल्या रावेर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेण्याचा प्रयत्न श्रीराम पाटील करीत आहेत, तर दुसरीकडे मागील मताधिक्य टिकवण्यासाठी व ते वाढविण्यासाठी रक्षा खडसेंना संघर्ष करावा लागत आहे. नरेंद्र मोदींची जादू आणि त्यांची विकासकामे, श्रीराम मंदिर, काश्मीरचे ३७० कलम रद्द करणे आदी बाबींचा प्रभाव मतदारांवर कितपत आहे हे या निवडणुकीतून दिसून येणार आहे.

२०१९ ला रावेर विधानसभा क्षेत्रात मिळालेली मते

रक्षा खडसे (भाजप) : १०८००८

डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस) : ६८६७९

नितीन कांडेलकर (बहुजन वंचित आघाडी) १३६२९

एकूण मतदान : १९५५७१ मते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR