परभणी : तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला काठीने बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी पतीविरुद्ध परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव राजश्री कैलास कुलकर्णी (वय ३५) असे आहे. या प्रकरणी तिचा भाऊ अर्जुन देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी संतोष तुरे यांनी अर्जुन देशमुख यांना दूरध्वनीद्वारे त्यांच्या बहिणीला गंभीर मारहाण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर अर्जुन देशमुख व त्यांचे आतेभाऊ ब्राम्हणगाव येथील शेत आखाड्यावर पोहोचले. तेथे राजश्री कुलकर्णी या गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या.
त्यांना तातडीने उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात आरोपी पती कैलास कुलकर्णी याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत काठीने डोक्यावर, नाकावर तसेच पोटावर गंभीर मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत राजश्री यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान घटनास्थळी ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात तसेच पोलिस पाटील विकास सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे ब्राम्हणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
















