फतेहपूर : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वाद आणि सततच्या छळामुळे पत्नीने आपल्या पतीला जिवंत जाळून हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलवां पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तारापूर असवार गावात राहणारा ३८ वर्षीय अवधेश उर्फ पवन हा दारूच्या आहारी गेला होता. २ जुलै रोजी त्याचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह घरातील बंद खोलीत आढळून आला होता. सुरुवातीला या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली.
मृत अवधेशचा धाकटा भाऊ राजकुमार याने भावाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान अवधेशची पत्नी प्रीती देवी हिचे नाव समोर आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चौकशीदरम्यान पती अवधेश हा दारूच्या आहारी गेला होता आणि दारूसाठी वारंवार पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास तो तिच्याशी वाद घालायचा आणि प्रीतीला मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीही अवधेश मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि पैशांची मागणी केली. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. प्रीतीने पैसे देण्यासाठी नकार दिला, यावेळी त्याने प्रीतीला मारहाण केली.
यानंतर अवधेश नशेतच घरातील खाटेवर झोपून गेला. सततच्या छळाला कंटाळलेल्या प्रीतीने त्याच्यावर आणि बिछान्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर तिने खोलीला कुलूप लावून बँकेत जात असल्याचे शेजा-यांना सांगितले. काही वेळाने घरी परतल्यानंतर तिने आरडाओरडा करून ही घटना आत्महत्येसारखी दाखवण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी सांगितले. मात्र, तपासात संपूर्ण कट उघड झाला. मलवां पोलिस ठाण्याचे प्रभारी राजीव मिश्रा यांनी आरोपी महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
















