हैदराबाद : आयपीएलच्या १८ व्या मोसमात राजस्थान रॉयल्ससमोर २८० पार मजल मारल्यानंतर सनरायजर्स हैदराबादने ३०० पार धडक देणार असल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर हैदराबादची दुरावस्था झाली आहे. हैदराबादचे फलंदाज सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरले आहेत. हैदराबादच्या प्रमुख फलंदाजांनी घरच्या मैदानात लोकल बॉय मोहम्मद सिराजसमोर गुडघे टेकले. मात्र अखेरच्या क्षणी कर्णधार पॅट कमिन्स याने केलेल्या खेळीमुळे हैदराबादला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचता आलं. हैदराबादने गुजरातसमोर १५३ धावांचे आव्हान ठेवले आहे.
हैदराबादने २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून १५२ धावा केल्या. त्यामुळे आता हैदराबादला पराभवाच्या चौकारापासून वाचवण्याची सर्वस्व जबाबदारी ही गोलंदाजांवर असणार आहे. आता यात हैदराबाद यशस्वी ठरते की गुजरात विजयी होते? हे लवकरच स्पष्ट होईल.
ट्रेव्हिस हेड याचा अपवाद वगळता हैदराबादच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठी खेळी करण्यापासून गुजरातच्या गोलंदाजांनी वेळीच रोखलं. त्यामुळे हैदराबादच्या एकाही फलंदाजाला ३१ पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. तर अखेरच्या क्षणी पॅट कमिन्स याने नाबाद २२ धावांची खेळी करत हैदराबादची लाज राखली. त्यामुळे हैदराबादला १५० पार पोहचता आले.
ट्रेव्हिस हेड ८ धावा करुन माघारी परतला. अभिषेक शर्मा याने १८ धावा केल्या. ईशान किशन याला १७ धावांपुढे पोहचता आलं नाही. हेन्रिक क्लासेनला मोठी खेळीची संधी होती. मात्र साई किशोर याने वेळीच क्लासेनला रोखलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. क्लासेनने २७ धावा केल्या. नितीश कुमार रेड्डीने हैदराबादसाठी सर्वाधिक ३१ धावा केल्या. कामिंदु मेंडीसने १ धाव केली. अनिकेत वर्माने १८ धावांची निर्णायक खेळी केली. मोहम्मद शमीने एका चौकारासह ६ धावा केल्या. तर सिमरजीत सिंह याला भोपळाही फोडता आला नाही.
हैदराबादसाठी पुन्हा एकदा मोहम्मद सिराज याने चमकदार कामगिरी केली. लोकल बॉय सिराजने ४ ओव्हरमध्ये १७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तर प्रसिध कृष्णा आणि साई किशोर या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या.