हैदराबाद : ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा या जोडीने सहाव्या विकेटसाठी केलेल्या निर्णायक अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने सनरायजर्स हैदराबादसमोर १३४ धावांचे सन्मानजनक आव्हान ठेवले आहे. दिल्लीने २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १३३ धावा केल्या.
दिल्लीच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यामुळे दिल्लीला १०० धावा करता येतील की नाही? अशी शंका उपस्थितीत करण्यात येत होती. मात्र ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे दिल्लीला १३० पार मजल मारता आली. त्यामुळे आता हैदराबादचा हे आव्हान झटपट पार करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हैदराबादला हा सामना जिंकण्यात यश येते की दिल्ली धावांचा बचाव करते? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडले. कर्णधार पॅट कमिन्स याच्यासह हैदराबादच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना ढेर केले. दिल्लीचे टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. करुण नायर डावातील पहिल्याच बॉलवर आऊट झाला. फाफ डु प्लेसीस ३ रन्स करुन आऊट झाला. अभिषेक पोरेल ८ रन करुन माघारी परतला. केएल राहुल यानेही निराशा केली. केएलने १० धावा केल्या. त्यामुळे दिल्लीची स्थिती ५ आऊट २९ अशी झाली.