नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा त्यांच्या भाषणात स्वत:चा उल्लेख चहावाला असा करतात. लहान असताना आपण चहा विकला असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. मोदींचा हा दावा काँग्रेसने ब-याचदा खोडून काढल्याने त्यावरून मोठा राजकीय वादही निर्माण झालेला आहे. यादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जुना मुद्दा उकरून काढत पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी केलेल्या टीकेवर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ‘चहावाला’ या मुद्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे.
काँग्रेसच्या वतीने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मनरेगा कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी ‘चहावाला’ असण्याच्या दाव्यावर खरगे टीका केली. ‘मी चहावाला ही पंतप्रधान मोदी यांची मतांसाठी असलेली ड्रामेबाजी असल्याचे विधान खरगे यांनी केले. फक्त मतदान मिळविण्यासाठी मोदी आपण चहावाला असल्याचे सांगतात; पण खरोखरच त्यांनी आयुष्यात कधी चहा तयार केला आहे का? मोदी यांनी कधी हातात किटली घेऊन रेल्वेच्या डब्यांमध्ये जाऊन विकला आहे का? असा प्रश्नही खरगे यांनी उपस्थित केला.
भाजप सरकारवर टीकेची झोड
खरगे पुढे म्हणाले की, मोदी चहावाला असण्याचा बनाव फक्त मतदारांना आकर्षित करण्याचा भाग आहे. मोदी यांचे सर्व दावे म्हणजे केवळ नाटक आहे. केंद्र सरकारकडून गरिबांच्या प्रगतीपेक्षा निवडणुकीच्या प्रचाराला जास्त महत्त्व दिले जाते. सत्ताधा-यांनी खरंच कष्ट घेतले असते, तर आज त्यांना देशातील कामगारांच्या वेदना समजल्या असत्या. कष्टकरी वर्गाच्या हितापेक्षा भाजपाचा भर हा केवळ जाहिरात बाजीवरच राहिला आहे.
विकासकामांवर खरगे यांचे प्रश्नचिन्ह
पंतप्रधान मोदी नवीन रेल्वेगाडीला ‘हिरवा झेंडा’ दाखवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या प्रशासनाला काँग्रेस सरकारने केलेल्या विकासकामांना मागे टाकता आलेले नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात ज्या वेगाने रेल्वेमार्गांचे काम झाले होते, तसा वेगाचा टप्पा या सरकारला गाठता आलेला नाही. काँग्रेस सरकारच्या काळाच्या तुलनेत भाजपाच्या राजवटीत रेल्वेचा पायाभूत विकास खुंटला आहे. ‘वंदे भारत’सारख्या आधुनिक रेल्वेगाड्यांचा गवगवा केला जात असला तरीही सामान्य प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत रेल्वे विकासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोदी सरकार केवळ चमकोगिरी आणि प्रसिद्धीवर भर देत असून मूळ कामात मागे असल्याचा दावाही खरगे यांनी केला.
मोदी-शाह यांना दिले आव्हान
भाषणाच्या शेवटी खरगे यांनी सध्याचे केंद्र सरकार हे ‘फक्त दोन व्यक्तींचे सरकार’ (मोदी-शाह) असल्याची टीका केली. पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केवळ निवडणूक प्रचारासाठी देशभर फिरत आहेत. मनरेगा योजना रद्द करून, महात्मा गांधी यांचे नाव पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. गरिबांचे हक्क हिसकावून घेण्यासाठी सत्ताधारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निर्णयाला तीव्र विरोध करणार आहोत. एकदा रोजंदारीवरील मजूर होऊन बघा, खरा भारत तुम्हाला तिथेच समजेल, असे आव्हानही खरगे यांनी पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना दिले.

