22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeधाराशिवराष्ट्रवादीशी पटत नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात

राष्ट्रवादीशी पटत नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात

तानाजी सावंत यांची खदखद

धाराशिव : राष्ट्रवादीशी आपले आयुष्यभर पटले नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात असे खळबळजनक वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिले आहे. तानाजी सावंतांना जी मळमळ होतेय त्याचा इलाज मुख्यमंत्र्यांनीच करावा अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. तानाजी सावंतांच्या या वक्तव्यानंतर आता महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

तानाजी सावंत एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आपले कधीच पटले नाही. शाळेत असल्यापासून आतापर्यंत पटले नाही. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही.

तानाजी सावंतांचा इलाज मुख्यमंत्र्यांनी करावा
तानाजी सावंतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, तानाजी सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत, आरोग्याचा काही संबंध असेल. मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील.

जर महायुतीच्या तीनही पक्षांनी एकत्र राहून निवडणूक लढवायची ठरवली असेल तर असे वादग्रस्त वक्तव्य असेल, राणेंचे किंवा आता तानाजी सावंतांचे वक्तव्य असेल हे कशाकरता करतात हे माहिती नाही. त्यांना कशामुळे मळमळ होत आहे हे माहिती नाही. आता तानाजी सावंतांचा इलाज हा मोठे डॉक्टर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. तानाजी सावंत हे अशाप्रकारचे वक्तव्य वारंवार करतात. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच त्यांना तंबी द्यावी अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR