Homeराष्ट्रीयमानवी बुद्धिमत्ता कमी पडली तर एआय मदतीला

मानवी बुद्धिमत्ता कमी पडली तर एआय मदतीला

देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांना कोपरखळी

नवी दिल्ली : येथे पार पडलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले. तसेच समिटदरम्यान त्यांनी हलक्याफुलक्या शब्दांत राजकीय विरोधकांवरही टीका केली.

याशिवाय, हा एआय समिट भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. वेगाने बदलणा-या एआय क्षेत्रात भारताने साधलेली प्रगती जगासमोर मांडण्याची ही संधी असल्याचे ते म्हणाले. विविध क्षेत्रांमध्ये क्रांती घडवणा-या एआय संदर्भात जागतिक नेते भारतात येऊन चर्चा करत आहेत, ही बाब देशाच्या वाढत्या क्षमतेचे द्योतक आहे. विशेषत: कृषी क्षेत्रातील एआय आणि महाराष्ट्राने साधलेल्या यशावर केंद्रित सत्राला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

जग सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे असल्याचे त्यांनी नमूद केले. हवामानातील वाढती अनिश्चितता, घटत चाललेली भूजल पातळी, मातीची खालावत चाललेली सुपीकता, कमकुवत होत चाललेल्या पुरवठा साखळ्या आणि अनियमित बाजारपेठ या कारणांमुळे जागतिक अन्न प्रणालींवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेषत: ग्लोबल साऊथमधील देशांसाठी शेती ही केवळ आर्थिक क्रिया नसून उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा आधारस्तंभ आहे, असे ते म्हणाले.

भारताने तंत्रज्ञानावर आधारित सर्वसमावेशक विकासाची दिशा स्वीकारली असल्याचे सांगताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. इंडिया एआय मिशन चा उद्देश तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि मोठ्या प्रमाणावर परिणाम साधणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र या ध्येयपूर्तीत कृषी क्षेत्राला मध्यवर्ती स्थान देणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले. भारतातील अर्ध्या अब्जाहून अधिक लोकांचा थेट किंवा अप्रत्यक्ष उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. तरीही लहान भूधारकांना तुटपुंज्या माहितीचा आधार, वाढते इनपुट खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि कर्ज व बाजारपेठेपर्यंत मर्यादित पोहोच अशा अडचणींना सामोरे जावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शेतक-यांना मोठी मदत होणार
महाराष्ट्रात राबवण्यात येणा-या एआय आधारित उपक्रमांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, पारंपरिक कृषी विस्तार व्यवस्था समर्पित असली तरी आजच्या गरजेनुसार तिची गती आणि व्याप्ती अपुरी पडते. एआय ही परिस्थिती बदलू शकते, असे ते म्हणाले. एआयच्या साहाय्याने अतिसूक्ष्म स्तरावरील हवामान अंदाज, कीड प्रादुर्भावाबाबत आगाऊ सूचना, अचूक सिंचन आणि खत सल्ला, पीकआधारित कर्ज मूल्यमापन, पारदर्शक पुरवठा साखळी आणि तत्काळ बाजार मार्गदर्शन शक्य होते. यामुळे शेतक-यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो आणि जोखीम कमी होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ तंत्रज्ञानावर विसंबून राहू नये
तथापि, केवळ तंत्रज्ञानावर विसंबून चालणार नाही, याची जाणीव करून देताना फडणवीस म्हणाले की, एआयचा पाया विश्वासार्ह डेटावर आणि नैतिक प्रशासनावर असला पाहिजे. पंतप्रधानांच्या उद्घाटनपर भाषणातील विचार उद्घृत करत त्यांनी सांगितले की, विश्वास, नैतिक शासन आणि सार्वजनिक जबाबदारीशिवाय एआयचा विस्तार शक्य नाही. जर लोकांचा विश्वास मिळाला नाही, तर कितीही प्रगत तंत्रज्ञान असले तरी ते मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जाणार नाही, असे त्यांनी अधोरेखित केले.

शेतकरी एआय स्वीकारण्यास तयार
राज्य सरकारने विकसित केलेल्या एआय-सक्षम मोबाईल प्लॅटफॉर्मचा उल्लेख करताना त्यांनी त्याला शेतक-यांसाठी डिजिटल मित्र असे संबोधले. हा प्लॅटफॉर्म बहुभाषिक असून प्रत्येक शेतक-याच्या गरजेनुसार वैयक्तिक सल्ला, बाजार माहिती आणि शासकीय योजनांपर्यंत सुलभ प्रवेश उपलब्ध करून देतो. एआय शेतक-यांसाठी डिझाईन केले गेले तर शेतकरी ते स्वीकारण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले. कापूस उत्पादकांसाठी भू-स्थानिक विश्लेषण आणि नंतरच्या देखरेखीच्या यंत्रणेद्वारे तयार करण्यात आलेल्या पूर्वसूचना प्रणालीचा उल्लेख करत त्यांनी त्याला प्रेडिक्टिव्ह गव्हर्नन्स इन अ‍ॅक्शन असे वर्णन केले.

आधुनिक शेतीचा नवा अध्याय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ येथे एआय फॉर अ‍ॅग्रिकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स या विषयावर संबोधन केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, जगभरातील अन्नसाखळीवर वाढता ताण, हवामान बदलाचे गंभीर परिणाम, पाण्याची कमी होत असलेली पातळी आणि मातीच्या गुणवत्तेतील हानी या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका निर्णायक आहे. अनेक देशांसाठी शेती ही केवळ अर्थकारण नाही, तर सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचा आधार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR