मुंबई : विशेष प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड एक महत्वपूर्ण बैठक झाली. चौघांमध्ये १५ ते २० मिनिटं खलबते झाल्याची माहिती समोर येत आहे. या खलबतखान्यात अमित शाहांनी मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना प्रचारावर भर देण्याच्या मुद्यावर ताकीद दिल्याचे समजते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये अमित शाहांकडून महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेण्यात आला. विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या, शेवटच्या टप्प्यात प्रचारावर भर द्या, अशा सूचना अमित शाहांकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलं आहे. या संकल्पपत्रामध्ये पक्षाकडून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देणार, शेतक-यांना कर्ज माफी, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, महिलांना आर्थिक साक्षर करणार, महिलांना उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार, महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात २५ हजार महिला पोलिसांची भरती करणार अशा विविध घोषणा भाजपकडून आपल्या संकल्पपत्रात करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये अमित शाह यांनी विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या, शेवटच्या टप्प्यात प्रचारावर भर द्या, अशा सूचना केल्याची माहिती समोर आली आहे.