21.5 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातही ‘सोनम’, पतीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला

महाराष्ट्रातही ‘सोनम’, पतीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात मालगोंदा येथे एका पत्नीने पती यशवंत ठाकरे यांची कु-हाडीने वार करून हत्या केली, त्याचे तुकडे करून घरातच पुरले. दोन महिन्यांपासून मुलगा गुजरातला गेल्याने आणि सुनेच्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे संशय वाढला. पोलिसांनी तपास करत घराच्या शोषखड्ड्यातून यशवंतचा मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान, नाशिकमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथे एका पत्नीने आपल्या पतीची कु-हाडीने वार करून हत्या करत पतीचे तुकडे करून ते घरातच पुरले. ही घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. इंदोरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच, ही घटना समोर आली आहे.

यशवंत मोहन ठाकरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथील रहिवासी होते. आपला मुलगा दोन महिन्यांपासून गुजरातमध्ये मजुरीसाठी गेला. तो अजूनही परत न आल्याने यशवंतच्या आई-वडिलांनी सुनेकडे विचारणा केली. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.

दरम्यान, सून स्वत: गुजरातच्या बिलीमोरा येथे निघून गेली. त्यामुळे घरच्यांना संशय आला. यशवंत परत न आल्याने त्यांनी अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पण काहीच पत्ता लागला नाही. अखेर, यशवंतच्या भावाची पत्नी प्रभाला भेटायला आली. त्यावेळी तिला काहीतरी संशयास्पद वाटले. तिने ही गोष्ट आपल्या नव-याला सांगितली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

पोलिसांनी अधिक तपास केला. तेव्हा घराच्या शोषखड्ड्यात यशवंतचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गोणीतील तुकडे असलेला मृतदेह ताब्यात घेतला. घरातील शोषखड्ड्यात त्याचा मृतदेह आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सुरगाणा पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सोनम रघुवंशी या महिलेने हनिमूनला गेल्यानंतर प्रियकराच्या मदतीने राजा रघुवंशी या आपल्या पतीची हत्या केल्याच्या घटनेने देशभर खळबळ उडाली. सोनमच्या क्रूरतेची घटना ताजी असतानाच नाशिकमधून ही घटना समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून सदर महिलेने कोणत्या कारणामुळे आपल्या पतीची हत्या केली, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR