29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयपुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

‘मर्द’ पक्षाचा अजब जाहीरनामा

लखनौ : राजकीय पक्ष कोणताही असो त्याच्यासाठी लोकसभा निवडणूक ही अटीतटीचा संघर्ष असतो. प्रत्येकजण स्वत:चा विजय व्हावा म्हणून प्रयत्न करत असतो त्यासाठी प्रचारावरही कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो पण काहींसाठी मात्र जिंकण्यापेक्षा लढणे महत्त्वाचे असते.

‘मेरा अधिकार राष्ट्रीय दल’ (मर्द) हा पक्ष त्यापैकीच एक आहे. पुरुषांच्या हक्कांचे संरक्षण हा मुद्दा घेऊन हा पक्ष राजकीय रणमैदानात उतरला आहे. या पक्षाची स्थापना २०१८ मध्ये झाली त्यानंतर त्याने अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरून उमेदवार उभे केले पण त्यांचे साधे डिपॉझिटही वाचू शकले नाही. या निवडणुकीसाठी या संघटनेने स्वत:चा वेगळा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला असून ‘ बेटों के सम्मान में, मर्द उतरे मैदान मे’ अशी त्याची टॅगलाईन आहे. या पक्षाने आतापर्यंत लखनौ, रांची आणि गोरखपूर येथून उमेदवार जाहीर केले आहेत. याआधी या पक्षाने २०१९ मध्ये वाराणसी, लखनौ या मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या आहेत. २०२० मध्ये झालेली बांगार्मू विधानसभा निवडणूक आणि बरेली, उत्तर लखनौ, बक्षी तालाब (लखनौ) आणि चौरीचौरा येथूनही या पक्षाचे उमेदवार विधानसभा निवडणूक लढले आहेत. पण कोठेही त्यांना यश मिळाले नाही.

महिला सुरक्षेच्या नावाखाली अनेक पुरुषांचा मानसिक छळ होतो त्याबाबत आवाज उठविण्याचे काम आम्ही करणार आहोत. आमच्यासाठी जय आणि पराजय गोष्टी फारशा महत्त्वाच्या नाहीत. यावेळेस देखील आमचे अनेक उमेदवार डिपॉझिट गमावतील अशी स्थिती आहे असे राष्ट्रीय सरचिटणीस आशुतोषकुमार पांडे यांनी म्हटले आहे. लोकसंख्येतील अर्धा घटक असणा-या पुरुषांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. आम्ही मांडत असलेल्या समस्यांकडे लोकांचे लक्ष जावे या उद्देशानेच आम्ही ही निवडणूक लढत आहोत असे राष्ट्रीय अध्यक्ष कपिल मोहन यांनी म्हटले.

पक्षाची आश्वासने
– पुरुषांसाठी वेगळे मंत्रालय तयार करणार
– राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापना करणार
– पुरुषांची, सुरक्षा आरोग्यासाठी वेगळे धोरण
– पुरुष सुरक्षा विधेयक संसदेमध्ये आणणार

वेगळ्या हेल्पलाइनचा आग्रह
अनेक प्रकरणांमध्ये पुरुषांची बाजू ऐकूनच घेतली जात नाही. महिलांप्रमाणे पुरुषांसाठी देखील हेल्पलाइन सुरू करण्याचा आमचा विचार आहे. मागील वर्षभरात दोनशे पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत पण त्यांचे म्हणणे कुणी ऐकून घेत नाही. पुरुषांच्या हक्काबाबत आपला समाज देखील जागरूक होईल पण त्याचा वेग हा मात्र कमी आहे असे आशुतोष पांडे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR