21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्याच्या कसबा, पर्वतीमध्ये मतविभाजनाचा धोका अटळ

पुण्याच्या कसबा, पर्वतीमध्ये मतविभाजनाचा धोका अटळ

पुणे : प्रतिनिधी
कसबा आणि पर्वती विधानसभा मतदार संघाचा या निवडणुकीत एक समान धागा आहे तो म्हणजे या दोन्ही मतदार संघात मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला होणार या प्रश्नाचे उत्तर निकालावरून स्पष्ट होणार आहे.शहराच्या मध्यवस्ती भागातील हे दोन्ही मतदार संघ. एका अर्थाने भारतीय जनता पक्षाला अपवाद वगळता झुकते माप देणारे आहेत.

कसबा मतदार संघ : कसबा मतदार संघ हा शहर आणि जिल्ह्यातील सर्वात लहान मतदार संघ होय. या मतदार संघातील मतदार संख्या ही जवळपास ३ लाख इतकी आहे. गेली अनेक वर्ष या मतदार संघाचे प्रतिनिधित्व तत्कालीन आमदार अरविंद लेले तत्कालीन आमदार आणि माजी मंत्री स्व. गिरीश बापट यांनी केले. त्यांच्यानंतर महापौर पद भूषविणा-या मुक्ता टिळक यांनी प्रतिनिधित्व केले. मध्यंतरीच्या काळात कॉँग्रेस पक्षाने ही जागा जिंकली होती. त्यानंतर दोन वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने पुन्हा बाजी मारली.

आता पुन्हा पोटनिवडणुकीतील दोन्ही उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत. विद्यमान आमदार कॉँग्रेस पक्षाचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने हे उमेदवार आहेत. कॉँग्रेस पक्षाच्या माजी महापौर आणि पक्षाचा आदेश नसताना कमल व्यवहारे या रिंगणात आहेत याचा अर्थ महाविकास आघाडीच्या मताचे विभाजन होणार आहे.

पर्वती मतदार संघ : कसबाप्रमाणे पर्वती या मतदार संघात देखील महाविकास आघाडीच्या मत विभाजनाचा पेच निर्माण झाला आहे. या मतदार संघात गेली तीन टर्म विधानसभा सदस्य म्हणून काम करणा-या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या अश्विनी कदम आणि कॉँग्रेस पक्षाचे आबा बागूल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या मतदार संघातून पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले आणि राजेंद्र शिळीमकर यांनी मागणी केली होती आणि उमेदवारी न मिळाल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली. हा मतदार संघ ज्याप्रमाणे काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला आणि त्यामध्येही रा. स्व. संघाला मानणारा मतदार संघ आहे असे म्हणता येईल. पण आता बागूल यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीमध्ये उत्कंठा वाढली आहे.

कसबा आणि पर्वती विधानसभा मतदार संघातील उमेदवार हे गेल्या निवडणुकीत होते तेच आहेत, मात्र पक्षाचा आदेश नसतानाही या दोन्ही मतदार संघात उमेदवारी कायम ठेवणारे उमेदवार यांच्यामुळे दोन्ही लढती चर्चेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR