मुंबई : देशाच्या गृहनिर्माण क्षेत्रात अव्वल क्रमांक गाठणा-या मुंबई शहराने गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भात आशिया-पॅसिफिक विभागातील शहरांच्या यादीत नववा क्रमांक गाठला आहे.
या यादीत मात्र बंगळुरूने मुंबईला क्रमांकाने मागे टाकत आठवा क्रमांक मिळवला आहे, तर देशाची राजधानी असलेली दिल्ली अकराव्या क्रमांकावर आहे.
गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित एका अग्रगण्य कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सिंगापूर या शहराने अव्वल क्रमांक कायम राखला आहे. नवीन प्रकल्प सादर करणे आणि गृहनिर्माणाच्या विकासाचा दर यामध्ये बंगळुरूने बाजी मारली आहे.
२०२३ या वर्षाच्या दुस-या तिमाहीत बंगळुरूमधील बांधकाम क्षेत्राचा विकास ७.११ दराने झाला, तर मुंबईत हाच विकासाचा दर ०.१ टक्का कमी अर्थात ७ टक्के इतका झाल्याचे यात नमूद आहे.
दिल्लीमधील बांधकाम क्षेत्राने सरत्या वर्षाच्या दुस-या तिमाहीत ६ टक्के दराने विकास केला आहे. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये देशात जी घरांची एकूण विक्री झाली त्यापैकी ६० टक्के विक्री ही मुंबई, दिल्ली व बंगळुरू या तीन प्रमुख शहरांत झाल्याचे या सर्वेक्षणाद्वारे दिसून आले आहे.