ठाणे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा कल्याण पश्चिम भागातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला बनावट कागदपत्रे तयार करून नावावर केल्याची घटना घडली. किल्ल्याची जागा नावावर करणा-या बंटी विरोधात विविध कलमानुसार महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सुयश शिर्के (सातवाहन) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.
बंटी-बबली या हिंदी चित्रपटात बनावट कागदपत्रे तयार करून ताजमहल आपल्या नावाने करून विक्री करण्याचा प्रसंग दाखविण्यात आला आहे. अशाच प्रकारे कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या जागेचे वंशज असल्याचे दाखूवन बनावट कागदपत्रांच्या आधारे तो स्वत:च्या नावाने केला. मात्र जागा विक्री होण्यापूर्वीच हा प्रकार कल्याण मंडळ अधिकारी असलेल्या महिला अधिकारी प्रीती घुडे यांच्यामुळे उघडकीस आला. घुडे यांनी 2 नोव्हेंबर रोजी सुयश शिर्के (सातवाहन ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेला सुयश शिर्के याने १२ सप्टेंबर २०२२ रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करून कल्याण तहसील कार्यालयातील ५ ते ७ कागदपत्रांवर शिक्के आणि अधिका-यांच्या बनावट सह्या असलेले कागदपत्रे अर्जासोबत जोडले होते. सदरच्या जागेचे प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्याने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले होते.
दरम्यानच्या काळात किल्ल्याची पडझड झाल्याने दुरुस्ती करावी म्हणून स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाशी पत्र व्यवहार करून किल्ल्यासंदर्भात लेखी माहिती मागवली असता सदरची जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने त्यांच्याकडून दुरुस्तीची परवानगी द्यावी, असा उल्लेख करत पोलिसांना कळविण्यात आले.
तहसीलदारांच्या नावाचे
बनावट लेटर सापडले
दुसरीकडे कल्याण मंडळ अधिकारी कार्यलयात या किल्ल्याच्या जागेसंदर्भात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी दस्तावेज तपासणीदरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरसह अधिका-यांच्या स्वाक्षरी केलेला दस्तावेज आढळून आल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी कल्याण तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रीती घोडे यांच्या तक्रारीनंतर कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्यात सुयश शिर्के नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.