मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महायुतीच्या नेत्यांची बैठक वर्षा बंगल्यावर बोलावली होती. यावेळी त्यांनी आमदार-खासदारांना लोकसभेसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागतील. महायुतीला एकत्र निवडणुका लढायच्या आहेत, असे शिंदे बैठकीत म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत भाष्य केले. सत्ताधारी आमदारांनी मराठा आरक्षणावरून मंत्रालयात केलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीयांची भूमिका एकच असायला हवी. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे बैठकीत म्हणाले.
एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेसाठी सर्व मतदारसंघामध्ये जोमाने तयारीला लागा. सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवा. सर्वांनी एकजुटीने राहावे आणि एकमेकांशी समन्वय ठेवावा. तसेच एकमेकांशी वाद टाळा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा जिंकून द्यायचे आहे. त्यामुळे मतदारसंघात मोर्चेबांधणी करायला सुरुवात करा. सत्तेत राहून सरकारवरील टीका कटाक्षाने टाळा. एकमेकांवर टीका-टिप्पणी करू नका. मराठा आरक्षण देताना इतर आरक्षणाला आपल्याला धक्का लावायचा नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.