22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरबीडमध्ये बेमुदत संचारबंदी

बीडमध्ये बेमुदत संचारबंदी

आंदोलकांनी आ. प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांची घरे पेटविली गाड्याही जाळल्या, माजलगावात न. प., दोन्ही नेत्यांच्या संस्थांनाही आग

बीड/जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बीडमध्ये अक्षरश: वणवा पेटला आहे. आक्रमक आंदोलकांनी थेट बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्लाबोल केला. एवढेच नव्हे, तर त्यांच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही जाळल्या. तसेच माजलगाव नगर परिषद, सोळंके यांच्या संस्थांमध्येही धुडगूस घालत आग लावली. याची धग कमी होत नाही, तोच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांचे घरही पेटवून दिले. तसेच राष्ट्रवादी भवन, केएसके कॉलेज, हॉटेललाही आग लावली. आंदोलक हिंसक बनल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी जाळपोळ झाल्याने बीड जिल्हा आणि सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर हद्दीपर्यंत आणि सर्व महामार्गावर पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आमदार प्रकाश सोळंके यांनी जे वक्तव्य केले, त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट त्यांच्या घरावर हल्ला केला. एवढेच नव्हे, तर त्यांच्या घराच्या आवारातील गाड्याही पेटवून दिल्या. त्यामुळे घर परिसरात धुराचे लोळ पसरले होते. एका आंदोलकाने आ. सोळंके यांना फोन केला, त्यावेळी जरांगे पाटील यांनी दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्याची आठवण करून दिली. त्यावेळी आ. सोळंके यांनी कोण म्हणतंय, सरकार आरक्षण देत नाही. ४० दिवस झाले म्हणून काय झाले, हे आरक्षण देऊन परत कोर्टात अडकवून ठेवायचे का, आरक्षणाबाबत अशी आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही, असे म्हटले. तसेच शासनाने समिती नेमली आहे. त्या समितीचा अहवाल घेऊन शासन आरक्षण देणार आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी थेट त्यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या बंगल्याच्या आवारात घुसून गाड्याही जाळल्या.

माजलगाव न.प.मध्ये जाळपोळ
माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवून दिले असतानाच आक्रमक आंदोलकांनी थेट माजलगाव नगर परिषदेच्या इमारतीत घुसून जाळपोळ केली. त्यामुळे नगर परिषदेला मोठी आग लागली. यासोबतच जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, जाळपोळीचे प्रकार घडले. बसही पेटवून दिल्याने जिल्ह्यात बससेवा ठप्प झाली आहे.

तहसीलदारांच्या गाड्याही फोडल्या
आक्रमक आंदोलकांनी जालना जिल्ह्यात काल तहसीलदारांची गाडी अडवून ती फोडली. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यामधील मानोली येथेही तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांची गाडी फोडली. यासोबतच बीड जिल्ह्यातील आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची गाडी पेटवून देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR