38.4 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeक्रीडाअफगाणचा लंकेवर ७ गड्यांनी विजय

अफगाणचा लंकेवर ७ गड्यांनी विजय

पुणे : २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने तिसरा विजय मिळवला असून या संघाने सोमवारी १९९६ च्या विश्वविजेत्या श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानने या मोसमात आतापर्यंत ३ माजी चॅम्पियन संघांना पराभूत केले आहे. यापूर्वी या संघाने पाकिस्तान आणि इंग्लंडला पराभूत केले आहे. रहमत शाहच्या ६२ धावा, तर हशमतुल्लाह शाहिदीच्या नाबाद ५८ धावा आणि अझमतुल्लाह ओमरझाईच्या नाबाद ७३ धावांच्या जोरावर ४५.२ षटकांत अफगाणिस्तान लंकेवर सहज विजय मिळविला.

४० षटकांत ७ बाद १८५ अशा घसरगुंडीनंतर श्रीलंका २०० धावांत गाशा गुंडाळेल असे वाटले होते. परंतु मॅथ्यूज आणि गोलंदाज महिश तिक्ष्णा यांच्या ४५ धावांच्या भागिदारीमुळे सव्वादोनशे धावांचा टप्पाही पार झाला. महिशाने ३१ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २९ धावा काढल्या. मॅथ्यूजनेही २३ धावांची जोड दिल्याने श्रीलंकेला २४१ धावांपर्यंत मजल मारता आली.

महिशाची फारुकीने दांडी उडवली. रजिथा पाच धावांवर धावबाद झाला. त्यानंतर मॅथ्यूज टोलेबाजी करण्याच्या नादात फारुकीच्या चेंडूवर साईटस्क्रीनजवळ सीमारेषेवर झेलबाद झाला. नबीने सुरेख झेल घेतला. अफगाणतर्फे फारुकीने सर्वाधिक चार बळी घेतले. मुजिबने ३८ धावांत दोन तर अझमतुल्ला आणि राशिद खानने प्रत्येकी १ बळी घेतला. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. निसांका आणि करूणारत्नेने डावाचा प्रारंभ केला. २१ चेंडूत १५ धावा काढून करूणारत्ने फारुकीच्या चेंडूवर पायचित झाला. १ बाद २२. दुस-या बाजूने निसांका चांगला खेळत होता. पुण्याची खेळपट्टी फलंदाज धार्जिणी दिसली. पावर प्लेमध्ये ४१ धावा निघाल्या.

निसांका-कुसल मेंडिस जोडीने दुस-या विकेटसाठी ६२ धावांची भर टाकली होती परंतु १९ व्या षटकांत निसांका अझमतुल्लाच्या चेंडूवर गुरबाझकडे झेल देऊन परतला. निसांकाने ६० चेंडूत ५ चौकारासह ४६ धावा काढल्या. श्रीलंका २ बाद ८४. नंतर मेंडीस आणि समरविक्रमाने धावफलक हलता ठेवला. या जोडीने तिस-या विकेटसाठी ५४ चेंडूत ५० धावांची भर टाकली परंतु २८ व्या षटकांत श्रीलंकेला जोरदार धक्का बसला तो भरवशाचा फलंदाज मेंडीस बाद होण्याने. ५० चेंडूत ३९ धावा काढणारा कर्णधार मेंडीस मुजीबच्या चेंडूवर बदली खेळाडू नजिबुल्लाद्वारा यष्टीपाठी झेलबाद झाला. यष्टिरक्षक गुरबाझ जखमी झाल्याने त्याच्या जागी नजिबुल्लाने यष्टिरक्षण केले. २८ व्या षटकांत ३ बाद १३४. येथून श्रीलंकेची घसरगुंडी सुरू झाली. धावसंख्येत ५ धावांची भर पडली आणि समरविक्रमाही परतला. ४ बाद १३९. समरविक्रमाने ४० चेंडूत ३६ धावा काढल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR