25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeराष्ट्रीयइंडिया आघाडीला चेहरा ठरवावा लागेल

इंडिया आघाडीला चेहरा ठरवावा लागेल

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची आज नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीआधी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या आघाडीचा समन्वयक किंवा निमंत्रक ठरवण्याची गरज आहे. आघाडीचा एखादा चेहरा ठरवता येतो का, याचाही विचार आज ना उद्या करावा लागणार आहे असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.

तुमच्या नावावर सर्वांचं एकमत झालं तर इंडिया आघाडीचे नेतृत्व करणार का, असा प्रश्नही या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, उगाच काही तारे तोडण्याची गरज नाही. सगळयांशी बोलू आणि चर्चा करू. मी या बैठकीत काही गोष्टी सुचवणार आहे. पण मी हरभ-याच्या झाडावर चढणा-यांपैकी नाही. त्यामुळे तुम्हाला कल्पना आहे की मला मुख्यमंत्रिपदही एक जबाबदारी म्हणून स्वीकारावे लागले आणि वेळ येताच मी एका क्षणात ते पद सोडलं. त्यामुळे मी कोणतीही वेडीवाकडी स्वप्न पाहणार नाहीत. माझ्यासमोर माझा देश आहे आणि देशातील जनतेची स्वप्न आहेत. आम्ही आमची वैयक्तिक स्वप्न घेऊन पुढे जाण्याचा काही उपयोग नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपले मत मांडले.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर आजच्या बैठकीत चर्चा होईल. डिसेंबर महिना अर्धा संपला आहे. आता लवकरच निवडणुकीचे वर्ष सुरू होईल. वेळापत्रकाप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होईल. या निवडणुकीच्या तयारीला आता सर्वांनी लागण्याची गरज आहे. बाकीच्यांच्या ज्या सूचना असतील त्यावर आमचं काय मत आहे, आमच्या काही सूचना आहेत, त्या आजच्या बैठकीत मांडल्या जातील अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.

नितीश कुमारांच्या पोस्टरवर दिली प्रतिक्रिया
इंडिया आघाडीच्या बैठकीआधी बिहारची राजधानी असलेल्या पाटणा इथं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्सची चर्चा होत आहे. पाटण्यात लावलेल्या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे की, जर खरंच विजय हवा असेल तर एक निश्चय पाहिजे, एक नितीश पाहिजे. या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही जे लोक एकत्रित आलो आहोत, त्यातील कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. काल खासदारांचे निलंबन झाले, सभागृहातील चित्रही आपण पाहिले. त्यामुळे देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही लोकशाही जिवंत ठेवली तर देश जगेल आणि ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR