मुंबई : वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेचा पराभव करत भारताने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा हा सलग सातवा विजय होय. यंदाच्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने आपला फॉर्म कायम राखत विजय नोंदवला. भारतीय संघाने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केले आहे.
भारताने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला. भारताचा विश्वचषकातील हा सर्वात मोठा विजय आहे, याआधी २००७ मध्ये संघाने बर्म्युडाचा २५७ धावांनी पराभव केला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ विकेट गमावत ३५७ धावा केल्या. दुस-या डावात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव १९.४ षटकांत ५५ धावांत आटोपला. या विजयासह हा संघ विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. भारताचे ७ सामन्यांतून १४ गुण झाले असून संघ स्पर्धेत अपराजित आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने ५, मोहम्मद सिराजने ३ आणि जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतली. याआधी शुभमन गिल (९२ चेंडूत ९२ धावा), विराट कोहली (९४ चेंडूत ८८ धावा) आणि श्रेयस अय्यर (५६ चेंडूत ८२ धावा) शतक झळकावण्यापासून वंचित राहिले. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी पाया रचला, तर श्रेयस अय्यरने याने चौकार-षटकार लगावत फिनिशिंग टच दिला.
वानखेडेच्या मैदानावर भारताने निर्धारित ५० षटकांत ८ विकेट्सच्या मोबदल्यात ३५७ धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिल ९२, विराट कोहली ८८ आणि श्रेयस अय्यर ८२ यांनी शानदार अर्धशतके ठोकली. श्रीलंकेकडून मधुशंका याने पाच विकेट घेतल्या. श्रीलंकेला विजयासाठी ३५८ धावांचे आव्हान मिळाले.
रोहित शर्मा दुस-या चेंडूवर बाद झाल्यानंतर विराट आणि गिल यांनी भारताच्या डावाला आकार दिला होता. दोघांमध्ये १८९ धावांची भागीदारीही झाली. पण दोघांना शतके ठोकता आली नाहीत. विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकाने हुलकावनी दिली. विराट कोहली वानखेडेवर वनडेतील ४९ वे शतक ठोकेल, अशीच सर्वांना आशा होती. पण लयीत असणा-या विराट कोहलीला मधुशंकाने तंबूत पाठवले. विराट कोहलीने वानखेडेवर रुबाबदार सुरुवात केली होती. त्याने एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत दावसंख्या हालती ठेवली होती.
शतकाच्या जवळ गेल्यानंतर विराट कोहलीची बॅट थोडी शांत झाली, अन् तिथेच श्रीलंकेच्या मधुशंकाने डाव साधला. मधुशंकाच्या गोलंदाजीवर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने ९४ चेंडूत ८८ धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने ११ चौकार लगावले. अय्यर बाद झाल्यानंतर अखेरच्या ३ षटकांत रविंद्र्र जाडेजाने चार्ज केला. जाडेजाने वादळी फलंदाजी करत भारताची धावसंख्या ३५० पार नेली. जाडेजाने २४ चेंडूत ३५ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला. जाडेजाने शामीसोबत ११ चेंडूत २२ धावांची महत्वाची भागिदारी केली.