नवी दिल्ली : भारत २०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने हा दावा केला आहे. जेफरीजने आपल्या अहवालात म्हटले की, आर्थिक विकास दरात सातत्याने होणारी वाढ, अनुकूल भू-राजकीय परिस्थिती, बाजार भांडवलाची वाढ, सुधारणांच्या दिशेने उचलली जाणारी पावले आणि मजबूत कॉर्पोरेट कल्चर, यामुळे भारत २०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल.
जेफरीजचे इंडिया इक्विटी विश्लेषक महेश नांदूरकर यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले की, भारत गेल्या १० वर्षांपासून ७ टक्के वार्षिक विकास दराने वाढत आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था $३.६ ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेसह आठव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर पोहचली आहे. भारतीय अर्थव्यवस्था पुढील चार वर्षांत ५ ट्रिलियन डॉलर्सची होईल आणि जर्मनी आणि जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
जेफरीजने आपल्या नोटमध्ये लिहिले की डॉलरच्या बाबतीत भारताचे इक्विटी मार्केट गेल्या १० ते २० वर्षांपासून सतत १०-१२ टक्के दराने वाढत आहे. भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी इक्विटी मार्केट बनली आहे आणि २०३० पर्यंत भारताच्या शेअर बाजाराची मार्केट कॅप $१० ट्रिलियनपर्यंत पोहोचू शकते. सुधारणांच्या दिशेने उचललेल्या ठोस पावलांमुळे भारताचा विकास वेगाने होत राहील. देशांतर्गत गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेतील अस्थिरता कमी झाली आहे.
पीएम मोदींचा दावा
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या सरकारच्या तिस-या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल असा दावा केला आहे. जगातील अनेक रेटिंग एजन्सी आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्सनीही हे भाकीत केले आहे. रेटिंग एजन्सी एस अॅन्ड पी ग्लोबल रेटिंग्सने डिसेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात हा दावा केला होता.