22.9 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeअंतरराष्ट्रीयभारतीय पर्यटकांचा मालदीवकडे काना डोळा!

भारतीय पर्यटकांचा मालदीवकडे काना डोळा!

दोन आठवड्यांत ४०० कोटींचा फटका भारताला डिवचणे मालदीवला भोवले

मुंबई : संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर आधारित असलेल्या मालदीवला भारताशी पंगा घेणे चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणे टाळल्यानंतर आता मालदीवला ४०० कोटींचा फटका बसल्याचे एका अहवालात सांगितले आहे.

भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक व्यासपीठावर त्याचा प्रचार करतात. मोदी हे लक्षद्वीपच्या दौ-यावर असताना त्यांच्यावर मालदीवच्या काही मंत्र्यांनी अवमानजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे भारत आणि मालदीवच्या संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. नंतर भारतीय पर्यटकांनी मालदिववर बहिष्कार टाकल्याचे दिसून आले. आता त्याचा परिणाम मालदीवला भोगावे लागत आहे. मालदीवला भेट देणा-या पर्यटकांच्या यादीत भारताचा सर्वात वरचा क्रमांक लागत आहे. मालदीव सरकारच्या एकूण उत्पन्नाचा मोठा हिस्सा पर्यटकांच्या खर्चातून येतो. मालदीवमध्ये जाणा-या पर्यटकांमध्ये सर्वाधिक संख्येने भारतीय आहेत. एका अहवालानुसार मालदीवचे जवळपास ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान
मालदीवमध्ये १८० हॉटेल्स आहेत, ज्यासाठी भारत ही मुख्य बाजारपेठ आहे. येत्या काही महिन्यांत मालदीवला भेट देणा-या भारतीय पर्यटकांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मालदीवचे आतापर्यंत २५-५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४०० कोटी रुपयेकिंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे. याचा परिणाम तिथल्या हॉटेल व्यावसायिकांवर होणार असल्याचे चित्र आहे.

मालदीवमध्ये भारतीय पर्यटक सर्वाधिक
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये भारत देशासाठी सर्वात मोठी पर्यटन बाजारपेठ आहे. मालदीवमध्ये सर्वाधिक २,०९,१९८ पर्यटक भारतातून आले होते. त्यानंतर रशियाचे २,०९,१४६ पर्यटक होते. १,८७,११८ पर्यटकांसह चीन तिस-या स्थानावर आहे. २०२२ मध्ये भारत २,४०,००० पर्यटकांसह मालदीव पर्यटन बाजारपेठेत अव्वल होता. त्यावेळी रशिया १,९८,००० पर्यटकांसह दुस-या स्थानावर आणि १,७७,००० हून अधिक पर्यटकांसह ब्रिटन तिस-या स्थानावर होता.

मालदीव पर्यटनावर अवलंबून
मालदीव त्याच्या अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठे क्षेत्र म्हणून पर्यटनावर अवलंबून आहे. मालदीवच्या जीडीपीच्या २८ टक्के क्षेत्र हे पर्यटन व्यवसायाचे आहे आणि त्यातून ६० टक्के परकीय चलन प्राप्त होते. गेल्या वर्षापर्यंत मालदीवची गणना भारताच्या चांगल्या मित्रांमध्ये होत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मोहम्मद मोइज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या दोन्ही देशांमधील संबंध थोडेसे बिघडू लागले होते. मात्र नुकत्याच घडलेल्या या प्रकरणामुळे भारतातील लोकांमध्येही संताप निर्माण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR