28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाआफ्रिकेसमोर भारताचे ३२७ धावांचे आव्हान

आफ्रिकेसमोर भारताचे ३२७ धावांचे आव्हान

बर्थडे बॉयचे ४९ वे शतक; अय्यरकडून धुलाई

कोलकाता : विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारताने आफ्रिकेविरोधात ३२६ धावांचा डोंगर उभारला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत पाच विकेट्सच्या मोबदल्यात ३२६ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्याशिवाय अय्यरने ७७ धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात केली तर रवींद्र जडेजाने फिनिशिंग टच दिला.

दरम्यान, विराट कोहलीने ईडन गार्डन मैदानावर शतक ठोकले. या शतकासह विराट कोहलीने वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणा-या सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. विराट कोहलीने अवघ्या २७७ डावांत ४९वे वनडे शतक ठोकले. सचिन तेंडुलकरला ४९ वनडे शतकांसाठी ४५२ डाव लागले होते. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने वादळी सुरुवात करून दिली. पण एकापाठोपाठ एक दोन धक्के बसल्यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. विराट कोहलीने ११९ चेंडूमध्ये शतक ठोकले. सुरुवातीच्या षटकात त्याने संयमी फलंदाजी केली. चांगल्या चेंडूला मान देत कोहलीने एकेरी-दुहेरी धावसंख्या काढली. त्याने आपल्या शतकी खेळीत १० चौकारांचा समावेश आहे.

शुभमन गिल बाद झाल्यानंतर अय्यर मैदानावर आला. पण सुरुवातीला आफ्रिकन मा-यापुढे अय्यर चाचपडला. जम बसल्यानंतर अय्यरने फटकेबाजी केली. अय्यरने ८७ चेंडूत ७७ धावांची झंझावाती खेळी केली. अय्यरने विश्वचषकातील तिसरे अर्धशतक ठोकले. अय्यर आणि विराट कोहलीने भारताच्या डावाला आकार दिला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १५८ चेंडूत १३४ धावांची भागीदारी केली.

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. रोहित शर्माने पहिल्या चेंडूपासूनच आफ्रिकन गोलंदाजांविरोधात हल्लाबोल केला. रोहित शर्माने गिलच्या साथीने पहिल्या विकेटसाठी ३५ चेंडू ६२ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत वेगाने धावसंख्या वाढवली. त्याने अवघ्या २४ चेंडूमध्ये ४० धावांचा पाऊस पाडला. या खेळीत रोहितने सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले. रोहित बाद झाल्यानंतर भारताची धावसंख्या संथ झाली. त्यातच शुभमन गिल बाद झाला. शुभमन गिल २४ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. गिलने चार चौकार आणि एक षटकार मारला.
अय्यर माघारी परतल्यानंतर राहुलकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण के. एल. राहुल मोक्याच्या क्षणी बाद झाला. राहुल मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. के. एल. राहुल याला १७ चेंडूत फक्त ८ धावा काढता आल्या.

सूर्यकुमार यादव याने फिनिशिंगचा प्रयत्न केला, पण मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादवने पाच चौकारांच्या मदतीने २२ धावांची खेळी केली. सूर्यकुमार आणि विराट कोहली यांच्यामध्ये २४ चेंडूत ३६ धावांची भागिदारी झाली. सूर्या बाद झाल्यानंतर जडेजा आणि विराट कोहलीने फिनिशिंग टच दिला. सूर्या बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाने वादळी फलंदाजी करत फिनिशिंग टच दिला. जडेजाने १५ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २९ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR