नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची जगभरातील लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. मे २०२५ मध्ये पार पडलेल्या या मोहिमेने फक्त पाकिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला ब्रम्होसच्या अचूक आणि विध्वंसक शक्तीची प्रचिती दिली. तेव्हापासून पश्चिम आशियापासून ते आग्नेय आशियापर्यंतचे अनेक देश हे क्षेपणास्त्र आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता फिलीपिन्समधून एक मोठी बातमी समोर आली असून फिलीपिन्स भारतासोबत ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा समावेश असलेला एक भव्य संरक्षण करार करण्याच्या तयारीत आहे.
भारत आणि फिलीपिन्स यांच्यातील संरक्षण भागीदारी अधिक भक्कम करण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, आकाश हवाई संरक्षण प्रणाली, पिनाका रॉकेट लाँचर, हेलिकॉप्टर्स आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्यासह अनेक मोठया करारांवर वाटाघाटी सुरू आहेत. फर्स्टपोस्टच्या वृत्तानुसार, फिलीपिन्स आपल्या लष्करासाठी ब्रम्होस क्षेपणास्त्र प्रणालीच्या किमान सहा अतिरिक्त बॅटरी खरेदी करण्याच्या विचारात आहे. याशिवाय, भारताकडून आकाश एअर डिफेन्स सिस्टीमच्या पाचपेक्षा अधिक रेजिमेंट आणि पिनाका रॉकेट लाँचर खरेदी करण्याचीही फिलीपिन्सची मोठी योजना आहे.
ब्रम्होस क्षेपणास्त्रासोबतच फिलीपिन्स भारताच्या इतर अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली खरेदी करण्याबाबतही गांभीर्याने विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिलीपिन्स आपल्या लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी भारताची आकाश हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याबाबत चर्चा करत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आकाश प्रणालीने बजावलेली प्रभावी कामगिरी आणि ती इतर संरक्षण यंत्रणांशी कशी जोडली जाऊ शकते, याबाबत फिलीपिन्सच्या संरक्षण अधिका-यांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे असे असले तरी, फिलीपिन्सचे हवाई दल सध्या लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यास अधिक उत्सुक असल्याचे मानले जात आहे.
भारताने दिला प्रस्ताव?
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने फिलीपिन्सला आपल्या नौदलाच्या युद्धनौकांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे बसवण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण आहे, कारण जमिनीवरून प्रक्षेपित होणा-या या क्षेपणास्त्र प्रक्षेपकाच्या वजनाबद्दल फिलीपिन्सने चिंता व्यक्त केली आहे. देशातील अनेक भाग डोंगराळ आणि दुर्गम असून, रस्त्यांची अवस्थाही खराब आहे, त्यामुळे हे जड प्रक्षेपक एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेणे अवघड होते.
फिलीपिन्सचा निर्णय अद्याप नाही
फिलीपिन्सने आपल्या नौदलाच्या युद्धनौकांवर ब्रम्होस क्षेपणास्त्र बसवण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. याचे कारण असे की फिलीपिन्सच्या नौदलाच्या युद्धनौकांवर आधीपासूनच अमेरिका आणि इतर देशांनी बनवलेली शस्त्रे व उपकरणे आहेत. त्यामुळे, या जहाजांमध्ये ब्रम्होस क्षेपणास्त्र बसवण्यापूर्वी त्यात महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक असेल.
















