नवी दिल्ली : देशातील औद्योगिक उत्पादनात ऑक्टोबर महिन्यात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
औद्योगिक उत्पादनाच्या वाढीचा दर ऑक्टोबरमध्ये ११.७ टक्क्यांच्या १६ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ही वाढ उत्पादन, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे झाली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी) वाढीचा दर ऑक्टोबर २०२३ मध्ये ११.७ टक्क्यांच्या १६ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ८ प्रमुख क्षेत्रांचा विकास दर ऑक्टोबरमध्ये १२.१ टक्के राहिल्याने देशातील औद्योगिक क्षेत्राने वेग पकडला असल्याचे यातून दिसून येते.
जून २०२२ मध्ये आयआयपी वाढीचा उच्च स्तर १२.६ टक्के होता. वर्षभरापूर्वी याच महिन्यात औद्योगिक उत्पादनात ४.१ टक्के घट झाली होती. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने (एनएसओ ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्रातील उत्पादन ऑक्टोबर महिन्यात १०.४ टक्क्यांनी वाढले होते, तर वर्षभरापूर्वी त्यात ५.८ टक्क्यांची घसरण झाली होती. खाण क्षेत्राचा विकास दर १३.१ टक्के होता जो मागील वर्षी याच कालावधीत २.६ टक्के होता. त्याच वेळी, वीज क्षेत्रातील उत्पादनात २०.४ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच कालावधीत वीज क्षेत्राच्या उत्पादनात १.२ टक्के वाढ झाली होती.